esakal | केसाच्या अंतराने हुकला विदर्भाचा विजय!
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर १९७४ च्या मोसमात उत्तर प्रदेशविरुद्धच्या तीन दिवसीय सामन्यात वर्चस्व गाजवूनही विदर्भाला विजयाने थोडक्यात हुलकावणी दिली होती. एक गाजलेला सामना या मालिकेत या सामन्याविषयी...

केसाच्या अंतराने हुकला विदर्भाचा विजय!

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : क्रिकेटमध्ये एक धाव किंवा एका विकेटचे किती महत्त्व असते, हे विदर्भ रणजी संघाला 46 वर्षांपूर्वी व्हीसीएवर झालेल्या एका सामन्यात कळून चुकले. उत्तर प्रदेशविरुद्धच्या झालेल्या त्या लढतीत तिन्ही दिवस विदर्भाने हुकूमत गाजविली. मात्र, निर्णायक स्थितीत एक गडी बाद करण्यात अपयश आल्याने विदर्भाला निर्णायक विजयापासून वंचित राहावे लागले.


हा तीनदिवसीय सामना 1974 मध्ये 25 ते 27 डिसेंबरदरम्यान खेळला गेला. विदर्भाचा संघ विजयाच्या दारावर असताना उत्तर प्रदेशची शेवटची जोडी मैदानात होती. मात्र, अथक प्रयत्न करूनही वैदर्भी गोलंदाज एक विकेट घेण्यात अपयशी ठरले. अगदी केसाच्या अंतराने विजय हुकल्याने साऱ्यांच्याच मेहनतीवर पाणी फिरले. विदर्भ संघात कर्णधार मूर्तिराजन यांच्याशिवाय विजय तेलंग, अनिल देशपांडे, अरुण ओगिराल, इम्रान अली, प्रकाश सहस्रबुद्धे, अशोक भागवत, एम. एस. जोशी, यू. दळवी व सुहास फडकरसारखे दिग्गज होते, तर उत्तर प्रदेश संघात विजय चोप्रा, महंमद शाहिद, अनिल भानोत, असद कासिम, रफिउल्लाह खान व जसबीरसिंगसारख्या त्या काळातील नावाजलेल्या खेळाडूंचा समावेश होता.

वाचा - 44 वर्षांपूर्वी व्हीसीएवर रंगला होता तेलंग शो

प्रथम फलंदाजी करणाऱ्या विदर्भाने सहस्रबुद्धे यांच्या 80 व देशपांडेंच्या 61 धावांच्या जोरावर पहिल्याच दिवशी तिनशेपार (307) धावा काढून पाहूण्या संघाला धोक्‍याचा इशारा देऊन टाकला. गोलंदाजांनीही आपली भूमिका प्रभावीरीत्या पार पाडत उत्तर प्रदेशला 177 धावांत गुंडाळून 130 धावांची भक्‍कम आघाडी घेतली. मोठ्या आघाडीसह दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या विदर्भाला काहीसा अतिआत्मविश्‍वास भोवला. विदर्भाने दुसरा डाव 8 बाद 159 असा घोषित करून सामन्यातील रंगत वाढविली. केवळ इम्रान अली (87 धावा) आणि दळवी (42 धावा) हे दोनच फलंदाज खेळपट्‌टीवर खंबीरपणे उभे राहिले होते.

आणखी वाचा - भिलाईमध्ये 55 वर्षांपूर्वी ठरला होता विदर्भ शेरास सव्वाशेर

अंतिम घाव घालण्यात वैदर्भींना अपयश
विजयासाठी शेवटच्या दिवशी 290 धावा काढणे सोपे नव्हते. उत्तर प्रदेशकडे असलेले "मॅचविनर्स' लक्षात घेता विदर्भाप्रमाणे त्यांनाही विजयाची तितकीच संधी होती. केवळ खेळपट्‌टीवर टिकून राहणे आवश्‍यक होते. मात्र, विदर्भाच्या अचूक माऱ्यापुढे फलंदाज नियमित अंतराने बाद होत गेल्याने उत्तर प्रदेश संघ 9 बाद 202 असा अडचणीत सापडला. त्यामुळे शेवटची महत्त्वपूर्ण षटके खेळून पराभव टाळण्याची सर्व जबाबदारी तिसऱ्या स्थानावर फलंदाजीस आलेले के. जुनेजा आणि शेवटचे फलंदाज ए. कासिम या जोडीवर येऊन पडली. ही जोडी फोडण्यासाठी विदर्भाचे कर्णधार मूर्तिराजन यांनी खूप प्रयत्न केले. मात्र, अथक प्रयत्नानंतरही ते उत्तर प्रदेशचा शेवटचा गडी बाद करू शकले नाहीत. अखेर 9 बाद 233 अशी स्थिती असताना रोमांचक ठरलेला सामना अनिर्णीत सुटला. पण, संधी असूनही अंतिम घाव घालू न शकल्याची हुरहूर वैदर्भी खेळाडूंच्या मनात कायम राहिली.