विदर्भ चळवळीचे नेते राम नेवले यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

विदर्भ चळवळीचे नेते राम नेवले यांचे निधन

नागपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक आणि अलीकडेच स्थापन केलेल्या जय विदर्भ पार्टीचे संस्थापक, शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष राम नेवले यांचे मंगळवारी (ता.१६) हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. मानेवाडा घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नेवले यांच्या निधनामुळे स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीचा बिनीचा कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

दि. ८ ऑक्टोबर १९५१ रोजी नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथे त्यांचा जन्म झाला. शेतकऱ्यांवरील अन्याय तसेच कृषी मालाला दाम मिळत नसल्याने ते शरद जोशी शेतकरी संघटनेकडे आकृष्ट झाले. तेव्हापासून त्यांनी स्वतःला आयुष्यभर सामाजिक कार्यात झोकून दिले. शेतकरी संघटनेचे ते प्रदेशाध्यक्ष होते. विदर्भ व विदर्भातील शेतकरी हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. पश्चिम महाराष्ट्रातील नेते आणि सरकार सातत्याने विदर्भ व विदर्भातील शेतकरी यांच्यावर अन्याय करीत असल्याने त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीत उडी घेतली. गेल्या २० वर्षांपासून ते स्वतंत्र विदर्भासाठीच्या आंदोलनात सक्रिय होते. या दरम्यान त्यांनी अनेक नेत्यांच्या घरांना घेराव घातला. घंटानाद केला. २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी विदर्भातील पुढाऱ्यांवर चांगलाच दबाव निर्माण केला होता.

हेही वाचा: पुणे आणि परिसरात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात

राज्यात आणि केंद्रात सत्ता आल्यास स्वतंत्र विदर्भाची निर्मिती केली जाईल असे शपथपत्र त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लिहून घेतले होते. वारंवार पत्र पाठवून त्यांनी दोन्ही नेत्यांना शपथपत्राचे स्मरणही करून दिले. मात्र, पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या आंदोलनाची भाजपच सरकारने दखल घेतली नसल्याने ते व्यथित झाले होते. त्यांनी अलीकडे जय विदर्भ पार्टीची स्थापना केली होती. आगामी महापालिका निवडणूक लढण्याचा इरादाही त्यांनी व्यक्त केला होता. तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे, यासाठी शेतकरी संघटनेचे नेते व कार्यकर्त्यांनी सरकारने लावलेली बंदी झुगारून एचटीबीटी बियाण्याची लागवड केली होती. त्यांच्या पत्नीचे चार वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.

हेही वाचा: मुंबई : शिक्षण विभागाच्या बैठकीत आमदार, संघटना प्रतिनिधी झाले नाराज

नेत्यांना सोडले होते भंडावून

भाजपच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांना वारंवार स्मरणपत्रे पाठवून निवडणुकीच्या वेळी स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीचे दिलेल्या आश्वासनांचे स्मरणपत्रे पाठवून त्यांनी दोघांना भंडावून सोडले होते. दुसरीकडे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात कोरोना काळातील वीज बिल माफ करण्यासाठी त्यांनी आंदोलन केले होते.

loading image
go to top