
पुणे आणि परिसरात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात
पुणे: पुण्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अचानक सुरु झालेल्या या पावसामुळे पुणेकरांची भंबेरी उडाली आहे. काल देखील रात्री पाऊस पडला होता. आजही जोरदार गडगडासह पाऊस सुरु आहे. तर पुढील सहा दिवस शहरात दुपारनंतर हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
कुठे कुठे पडतोय पाऊस?
आंबेगाव बुद्रुक, खुर्द, दत्तनगर, जांभूळवाडी, कोळेवाडी
घोरपडी, मुंडवा, केशवनगर, खराडी, बिबवेवाडी, विश्रांतवाडी, तळजाई पठारावर परिसरात जोरदार पाऊस पडतो आहे.
हडपसर, मांजरी परिसरात गडगडाटासह पाऊस
मांजरी खुर्द, कोलवडी परिसरात जोरदार पाऊस
भारती विद्यापीठ, कात्रज, कोंढवा, गोकुळनगर आदी भागातत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
फुरसुंगी ,उरुळी देवाची जोरदार पावसाची हजेरी
शहरात मंगळवारी सकाळपासून अंशतः ढगाळ वातावरण कायम होते. ढगाळ वातावरणामुळे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत 6 ते 7 अंश सेल्सिअस जास्त नोंदले गेले. शहरात 20.6 अंश सेल्सिअस तर लोहगाव येथे 21.8 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. रात्री उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे काही प्रमाणात वातावरणात गारवा पसरला होता. दरम्यान पुढील आठवडाभर ही स्थिती अशीच कायम राहणार असून किमान तापमानात चढ उतार देखील पाहायला मिळेल.
राज्यात पुढील चार दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्र येथे तुरळक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.
राज्यात सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ तर कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरी येथे 37.1 अंश सेल्सिअस तर नीचांकी तापमान 18 अंश सेल्सिअस जळगाव येथे नोंदले गेले.
सध्या अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, पश्चिमेकडे सरकणाऱ्या या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. या कमी दाब क्षेत्रापासून उत्तर कोकणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, गुरुवारी (ता.१८) ही प्रणाली आंध्र प्रदेश, तमिळनाडूच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. वरील दोन्ही कमी दाब क्षेत्रांच्या दरम्यान हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दोन्ही समुद्रांत तयार झालेली कमी दाबाचे क्षेत्रामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे.
विजांसह पावसाचा इशारा :
कोकण : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.