टेलरिंगच्या दुकानासमोरील सीएचे ऑफिस पाहून दोन्ही मुलांना बनविले सीए

मुलांना उच्चशिक्षित करून आदर्श निर्माण करणारे कामठी येथील विष्णू पोलकमवार
Vishnu Polkamwar from Kamathi Nagpur made Two boys CAs
Vishnu Polkamwar from Kamathi Nagpur made Two boys CAs

नागपूर - पायाला भिंगरी बांधल्यागत शिलाई मशीन चालविली. गुडघेदुखी, पाठदुखीची मुलाहिजा बाळगली नाही. टेलरिंगच्या दुकानासमोरील सीएचे ऑफिस पाहून मुलांना सीए बनविण्याचा मनोमन निश्चय केला. संसाराचा गाडा कसाबसा हाकताना मुलांच्या शिक्षणाचा दृढ निश्चय मात्र मनात होता. पोटाला चिमटा घेतला. परंतु दोन्ही मुलांना सीए केले. मुलांना उच्चशिक्षित करून आदर्श निर्माण करणारे कामठी येथील विष्णू पोलकमवार या `बाप`माणसाच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संघर्षाच्या पहाडांना विष्णूने केले पार

विष्णू पोलकमवार हे मुळचे कुठले हे त्यांनाही माहीत नाही. नागपूरचे असल्याचे त्यांचे वडील नागन्नाजी पोलकमवार हे सांगत. विष्णू आणि त्यांचे दोन भावंडं. त्यांचा लहान भाऊ सहा महिन्यांचा असताना आई वारली. दुःखाचा डोंगर कोसळला. आईचे छत्र हरपल्यानंतर ते भावंडांसोबत आजोळला कामठीत आले. १९७१-७२ चा काळ होता. अठराविश्व दारिद्र्य. त्यांच्या मावशीने त्यांचे पालनपोषण केले. विष्णू हे भावंडांत मोठे. बहिण नंदा, भाऊ महेश मावशीच्या कामात विष्णू यांनी मदत केली. लोकांच्या घरची भांडीकुंडी घासली. मात्र, दुसऱ्यापुढे हात पसरले नाही. स्वाभिमानाने जगले.

मुलांसाठी बापाचे झपाटलेपण

कामठीतील दर्जी ओळीत विष्णू टेलरिंगचे काम शिकले. दुसऱ्याकडे कारागीर म्हणून लागले. हप्ता २० रुपये मिळू लागला. दोन वेळेची उपासमार असताना हप्त्याला २० रुपये मिळू लागल्याने त्यांचा हुरूप वाढला. पोटाची सोय झाली. आता काही तरी नवीन करू म्हणून त्यांनी दर्जीओळमध्ये १९८६ मध्ये टेलरिंगचा व्यवसाय सुरू केला. हाताला यश आले. गिऱ्हाईकांची कमी नव्हतीच. मात्र, नववीपर्यंतच्या शिक्षणाची खंत आणि सल त्यांच्या मनात होती. पण, इलाज नव्हता. १९९९ मध्ये मामाच्या मुलीसोबत लग्न झाले. संसाराच्या वेलीवर तीन मुले बहरली. ममता, योगेश आणि विशाल मोठे होऊ लागले. त्यांच्या पालनपोषणात विष्णू आणि पत्नी संतोषी यांनी कोणतीही कमी पडू दिली नाही. टेलरिंगची ३६ वर्षे होत असताना मुलांच्या भविष्याची चिंता कायम सतावत होती.

शिकवणी न लावता यश

योगेशने २०१० मध्ये सीएची प्रवेशपूर्व परीक्षा दिली. उत्तीर्ण झाला. तो सीए झाला. आपल्यासाठी वडील प्रचंड कष्ट उपसताहेत, खस्ता खाताहेत हे पाहून कोणतीही खासगी शिकवणी लावली नाही. विशालने भावाच्या पावलावर पाऊल ठेवले. तोही सीए करीत आहे. फक्त दुकानासमोर सीएचे ऑफिस पाहून मुलांना सीए करणारे विष्णू पोलकमवार हे कदाचित एकमेव वडील असतील. कोणतीही मोठी शिकवणी न लावता दोन्ही मुले सीए झाल्याचे समाधान विष्णू यांच्या चेहऱ्यावर आहे. तर आई संतोषी यांना मुलांचा गर्व आहे.

गरुडझेप घ्यायचीय, वडिलांच्या पंखांना द्यायचेय बळ

योगेश याला कर व्यवसायात तर विशाल याला वस्तू आणि सेवा कर क्षेत्रात आवड आहे. दोन्ही भावंडांना भविष्यात मोठी कंपनी टाकून या क्षेत्रात गरुड झेप घ्यायची आहे. वडिलांच्या पंखांमध्ये बळ भरायचे आहे. सध्या तरी काही दिवस नोकरी करून शिकून घेण्याची इच्छा योगेश आणि विशाल यांनी व्यक्त केली.

आयुष्याचा अत्यंत खडतर प्रवास करून मुलांना चांगले आणि उच्च शिक्षण देता आले, याचे समाधान आहे. आयुष्याचे सोने झाले.

- विष्णू पोलकमवार.

...आणि सापडला मार्ग

विष्णू पोलकमवार यांच्या दुकानासमोर सीए असलेले ओ.आर. झोपट यांचे ऑफिस होते. त्यांच्यासोबत विष्णूची ओळख होती. या ऑफिसचा त्यांच्या अंतर्मनावर प्रभाव पडला. त्यामुळे विष्णू यांनी मुलांना सीए बनविण्याचा निर्धार केला. मुलगी ममता हिला शिकून मोठे व्हायचे होते. पण, शिक्षणाचा खर्च झेपत नसल्याने तीने एम.कॉम केले. कंपनीत नोकरी करू लागली. वडिलांना मदत करू लागली. तरीही मुलांचा प्रश्न होताच. शेवटी मार्ग मिळाला. टायपिंग इन्स्टिट्युटमध्ये जात असलेल्या योगेशला मुकेश चकोले, राजू पंडा, महेंद्र शर्मा यांनी सीएच्या परीक्षेची माहिती दिली. राजू पंडा हे त्या क्षेत्रात काम करीत होते. मार्ग मिळाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com