दोन मुलांना मारणाऱ्या बापानेही केली आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wardha crime suicide case

दोन मुलांना मारणाऱ्या बापानेही केली आत्महत्या

गिरड : जन्मदात्याने विष पाजून दोन चिमुकल्यांना संपविल्याची घटना वरोरा येथे घडली. मुलांना संपविल्यानंतर फरार असलेल्या आरोपी बापाने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याचा मृतदेह गिरड लगत असलेल्या साखरा गावात शनिवारी (ता. तीन) सकाळच्या सुमारास आढळून आला. संजय श्रीराम कांबळे (वय ४०) असे आत्महत्या करणाऱ्या या आरोपी बापाचे नाव आहे.

संजय याने आपल्या दोन मुलांना विष देत त्यांचा गळा आवळून हत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता. दोन) उघडीस आली. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरालगतच्या बोर्डा येथील होती. सुमित (वय सात), मिस्टी (वय तीन) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. या प्रकरणी वरोरा पोलिस फरार संजयच्या शोधात असताना साखरा गावाजवळील मंगरूळ फाट्या लगत शेतकरी धवणे यांच्या शेतात मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच गिरडचे ठाणेदार सुनील दहिभाते यांनी घटनास्थळी दाखल होत तपास केला. संजय कांबळे याने विष प्राशन करून जीवन संपविल्याचे निष्पन्न झाले.

समुद्रपूर तालुक्यातील साखरा गावातील रहिवाशी संजय कांबळे आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वरोरा तालुक्यातील बोर्डा येथे राहत होता. खासगी शिकवणी हा त्यांचा व्यवसाय होता. काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी पनिता (वय ३५) ही एका महाविद्यालयात कंत्राटी स्वरुपात नोकरीवर जात होती. त्यांच्या संसारवेलीवर सुमित, मिस्टी अशी दोन फुले उमलली होती.

काही दिवसांपासून संजयची मानसिक स्थिती बिघडली होती. यामुळे शिकवणी वर्ग बंद होण्याच्या मार्गावर होते. शुक्रवारी सकाळी पत्नी पनिता ही कॉलेजमध्ये गेली होती. सुमित आणि मिस्टी ही दोन मुले वडिल संजय कांबळे यांच्यासोबत घरी होती. याच वेळी त्याने दोन्ही मुलांना विष दिले.

पोलिसांना मिळाली चिट्ठी

पोलिसांना संजयने लिहिलेली चिट्ठी मिळाली. त्यात मी मुलांना मारले असून स्वतः आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख आहे. यामध्ये कोणत्याही नातेवाईकांना त्रास देऊ नये असे नमूद केले आहे.

समाजमन हळहळले

दोन्ही चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आला. चिमुकल्यांना अग्नि देताना समाजमन हळहळले. मृत वडील संजय कांबळे यांच्यावर साखरा या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.