

Nagpur
esakal
नागपूर: वेध प्रतिष्ठान द्वारा आयोजित वर्धा नदी शोध यात्रेदरम्यान वर्धा नदीच्या खोऱ्यातील विविध संस्कृतींचा अनुभव घेताना मुस्लिम राजवटीत झालेल्या वास्तू निर्मितीतून मुस्लिम संस्कृतीचाही अनुभव शोधयात्रींनी घेतला. तेराव्या शतकात महाराष्ट्रात मुस्लिम सत्तेचा उदय झाल्यानंतर वर्धा नदी ही दीर्घकाळ बहामनी व इमादशाही आमदानीत मुस्लिम आणि गोंड राज्यसत्तेच्या दरम्यानची सीमारेषा म्हणून कार्यरत होती. अचलपूरच्या इमादशाहीचा -हास होऊन निजामशाहीच्या कार्यकाळात सुद्धा परिस्थिती सर्वसाधारणपणे तीच राहिली. मुगल सम्राट अकबराने वऱ्हाड काबीज केल्यानंतर मात्र परिस्थितीत बदल होऊ लागला. गोंड सत्तेचे अस्तित्व कायम असले तरी ते मोगलांचे अंकित शासक होते. याच दरम्यान मोगल सम्राट जहांगीर याने मोहम्मद शहा नियाझी या उच्चपदस्थ अफगाणी सरदारास वऱ्हाडातील आमनेर, आष्टी, पवणार, तळेगाव (दशासर) या चार परगण्याचे नवाब अर्थात मुखत्यार नेमले.