
क्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांना जखमी प्राण्यांची माहिती देऊ लागला. त्यांच्यावर औषधोपचारासाठी अधिकाऱ्यांकडे आग्रह करू लागला. त्याचा हा आग्रह आता येथील अनेक वन्यजिवासाठी तारक ठरला आहे.
हौशी पक्षिनिरीक्षण करताकरता लागली वन्यजिवांची गोडी; जंगलात उभारली पक्ष्यांसाठी पाणपोई
वेलतूर (जि. नागपूर) : उन्हाळ्याच्या दिवसात इवल्याशा चिमणीचा इवलासा जीव अगदी काकुळतीला येतो. लाहालाहा करीत थेंबभर पाण्याच्या शोधात अख्खे शिवार पालथे घालतो. कधीकधी पाण्याअभावी घसा कोरड पडल्याने चिमणीला प्राणास मुकावे लागते. परंतु, या स्थितीवर मात करण्यासाठी एक पक्षिमित्र पुढे सरसावला आहे. जंगलात पक्ष्यांसाठी पाणपोयांबरोबर टाकाऊ वस्तूपासून कृत्रिम घरटे व दाणापाण्याची परिश्रम घेत आहे. पक्ष्यांच्या संगोपनाची जाणीव निर्माण करण्याचे काम कुही तालुक्यातील उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यालगतच्या चिकना या गावचा राकेश कळंबे सध्या करतो आहे.
चिकना हे गाव प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यालगत आहे. जंगल त्यांच्या जीवनाचा भाग आहे. त्या जंगलातील साप, पक्षी, प्राणी हे त्यांच्या जगण्याचा आधार आहेत. त्या आधाराला जगण्याची प्रेरणा बनवत वन्यजीव सेवेत सध्या राकेश कळंबे गुंग आहेत. जंगलात वा गावालगत, शेत शिवारात कुठलाही वन्यप्राणी अडचणीत दिसला की राकेश धाव घेतो आणि त्याच्यासाठी जिवनदाता ठरतो.
चार वर्षांपासून राकेश वन्यप्राण्यांच्या मदतीला अव्याहतपणे धावून येताना दिसतो. दिवस असो वा रात्र तो २४ तास मदतीला उभा. सर्पमैत्रीतून सुरू झालेला वन्यजीव संवर्धनाचा त्याचा हा वसा आता जगण्यासाठीची प्रेरणा ठरत आहे. बालपणापासून जंगलाशेजारी राहणारा हा तरुण वन्यजिवाच्या प्रेमात दिवाना आहे. त्याची ही दिवाणगी आता नवी ओळख बनली आहे.
खरंतर राकेश मुळात पक्षिमित्र. हौशी पक्षिनिरीक्षण करताकरता वन्यजिवांची गोडी लागली. गाव तलावावर जाऊन वेगवेगळे पक्षी बघताना त्याला आनंद व्हायचा. सोबत पाणी पिण्यासाठी येणारे वन्यजीवही तो न्याहाळू लागला. जंगलात वाघांची संख्या अधिक त्यामुळे हरणासारखे शिकार होणारे प्राणी अनेकदा जखमी अवस्थेत त्यांच्या नजरेत भरू लागले.
अधिक वाचा - आता १ नव्हे तर ४ वाजेपर्यंत सुरू राहणार दुकाने; सोमवारपासून होणार पुढील बदल
क्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांना जखमी प्राण्यांची माहिती देऊ लागला. त्यांच्यावर औषधोपचारासाठी अधिकाऱ्यांकडे आग्रह करू लागला. त्याचा हा आग्रह आता येथील अनेक वन्यजिवासाठी तारक ठरला आहे. तो इथेच थांबला नाही. उन्हाळ्यात त्याने टाकाऊ वस्तूपासून पक्ष्यांसाठी पाणपोई व कृत्रिम घरटी तयार केली आणि ते प्रत्येक गावात जाऊन लोकांना मोफत भेट स्वरूपात दिली. गावांमध्ये नाही तर बाहेरगावी जाऊन सुद्धा तो वन्यप्राण्यांसाठी धाव घेतो. त्यात साप नाही तर, पक्षी, घोरपड, माकड व इतर प्राण्यांची अडचणीतून सुटका करतो.
निसर्ग आहे, म्हणून आपण आहोत
निसर्ग आहे, म्हणून आपण आहोत. पशुपक्ष्यांचे आपण सर्वांनी संगोपन केलं पाहिजे.
- राकेश कळंबे, पक्षिमित्र