
Weather Update : फेब्रुवारी ‘हॉट’, मार्चही तापणार
नागपूर : फेब्रुवारी महिन्यात उन्हाचे चटके बसल्यानंतर मार्चही वैदर्भींची चांगलीच परीक्षा घेणार आहे. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहेत. मार्च महिन्यात पारा ४५ अंशांपर्यंत उसळी घेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हिवाळ्याने विदर्भातून अधिकृत निरोप घेतला असून, आता उन्हाळा सुरू झाला आहे. यंदाचा उन्हाळा किती तापणार आहे, याचा ट्रेलर फेब्रुवारीत पाहायला मिळाला. १ फेब्रुवारीचा अपवाद वगळता या महिन्यात नागपूरचे कमाल तापमान ३० ते ३८ अंशांच्या दरम्यान राहिले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये प्रथमच असे चित्र अनुभवायला मिळाले.
दरवर्षीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यातील सरासरी तापमान ३ ते ४ अंशांनी अधिक राहिल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक चटके अर्थातच अकोलेकरांना बसले. येथे कमाल तापमान चाळिशीला टेकले होते. वाशीम, ब्रम्हपुरी व चंद्रपूरमध्येही यंदा चांगलेच ऊन तापले. उन्हाच्या बाबतीत नागपूरही मागे राहिले नाही. येथे २३ फेब्रुवारी रोजी पारा मोसमातील उच्चांकी ३७.४ अंशांवर गेला होता.
हवामान विभागानुसार, बंगालच्या उपसागरात अधून-मधून तयार होणाऱ्या सिस्टिम्समुळे फेब्रुवारी महिन्यात विदर्भात ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस व कधी-कधी गारपीटही होते. वातावरणातील आर्द्रतेमुळे तापमानात मोठी घट होते. मात्र यावर्षी फेब्रुवारीमध्ये कसलीही सिस्टिम बनली नाही. शिवाय बर्फवृष्टीचाही प्रभाव जाणवला नाही. याच कारणांमुळे यावर्षीचा फेब्रुवारी दरवर्षीच्या तुलनेत थोडा ‘हॉट’ राहिला आहे.
हवामान बदलाचा परिणाम
नजीकच्या काळात पावसाची शक्यता नसल्यामुळे मार्चमध्येही तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. या महिन्यात पारा ४५ अंशांपर्यंत जाण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. निसर्गाचा एकूणच बदलता ट्रेंड लक्षात घेता एप्रिल आणि मे हे दोन महिने भीषण उन्हाचे राहणार, अशी चिन्हे आहेत.