कोटीची किंमत असलेल्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; चौघे ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वन विभागाने जप्त केलेली व्हेल माशाची उलटी

कोटीची किंमत असलेल्या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; चौघे ताब्यात

नागपूर : उलटी म्हटलं की कोणालाही किळस येतो. याकडे पाहण्यासाठी कोणी तयार होत नाही. मग हात लावण्याचा प्रश्नच नाही. परंतु, व्हेल माशाच्या (Whale fish) उलटीला (Vomiting) आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधींची किंमत मिळते. यामुळे व्हेलच्या उलटीची मोठ्या प्रमाणात तस्करी (Smuggling) केली जाते. नागपुरात उलटीची तस्करी करणाऱ्या चौघांना वन विभागाचा पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. या उलटीची किंमत जवळपास एक कोटी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

व्हेल माशाच्या (Whale fish) उलटीचा वापर महागडी सुगंधी द्रव्य, सौंदर्य प्रसाधने आणि औषधे तयार करण्यासाठी केला जातो. त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात महागड्या अत्तरामध्ये या उलटीचा वापर केला जातो. व्हेलच्या उलटीला प्रचंड किंमत मिळत असल्याने ‘फ्लोटिंग गोल्ड’ असेही म्हटले जाते.

हेही वाचा: Agneepath : एअर चीफ मार्शल चौधरी यांचा आंदोलकांना इशारा; म्हणाले...

नागपुरात एक टोळी व्हेल माशाच्या उलटीची (Vomiting) तस्करी (Smuggling) करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे वन विभागाने सापळा रचला आणि चार जणांना ताब्यात घेतले. अरुण गुंजर, पवन गजघाटे, राहुल दुपारे आणि प्रफुल्ल मतलाने (सर्व रा. नागपूर) यांच्याविरुद्ध वन्यजीव संवर्धन कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. व्हेल माशाची उलटी जप्त करण्याची नागपुरातील ही पहिलीच घटना असली तरी याचे मोठे रॅकेट आहे का याचा तपास केला जात आहे.

व्हेल माशाची उलटी कशी तयार होते?

व्हेलने (Whale fish) गिळलेल्या प्राण्यांचे टोकदार शरीर किंवा दातांमुळे शरीराच्या आतील भागात जखम किंवा इतर नुकसान होऊ नये यासाठी व्हेलच्या शरीरात हे द्रव तयार होते. यानंतर बाकी राहिलेले अवशेष व्हेल उलटीच्या माध्यमातून बाहेर काढते. काही संशोधकांच्या मते स्पर्म व्हेलच्या विष्ठेतूनही एम्बेग्रेस बाहेर पडते. त्यामुळेच या विष्ठेत व्हेलच्या भक्ष्याचे टोकदार दातही आढळून येतात. व्हेलच्या शरीरातून बाहेर पडल्यानंतर ही उलटी समुद्राच्या पाण्यात तरंगत राहते. सूर्यकिरण आणि समुद्रातील क्षार यांच्यामुळे रासायनिक प्रक्रिया होऊन या उलटीचे एम्बेग्रेसमध्ये रूपांतर होते.

हेही वाचा: २० मांजरींनी घेतला मालकिणीचा जीव; दोन आठवड्यांपासून होत्या उपाशी

रंग कसा असतो

एम्बेग्रेस काळा, पांढरा किंवा फिकट रंगाचा तेलकट पदार्थ असतो. याचा आकार साधारणपणे गोलाकार किंवा अंडाकार असू शकतो. हा एक ज्वलनशील पदार्थ आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सुरुवातीला एम्बेग्रेसचा गंध चांगला नसतो. परंतु, हवेशी संपर्कात येताच याचा सुवास वाढू लागतो. त्याला एक प्रकारचा गोड सुवास मिळतो. एम्बेग्रेस परफ्यूमचा सुगंध हवेत उडण्यापासून रोखण्याचे काम करतो.

दीड कोटी रुपये प्रति किलो

एम्बेग्रेस हा अत्यंत दुर्मीळ पदार्थ आहे. त्यामुळेच याची किंमतही खूप जास्त आहे. याला समुद्रातील सोनं किंवा तरंगणार सोने असेही संबोधले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत दीड कोटी प्रति किलोपर्यंत असू शकते.

Web Title: Whale Fish Worth Crores Of Rupees Seized Vomiting

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top