Padma Awards 2024 : अन् रस्त्याच्या कडेला इस्त्री करणारा तरुण शेकडो अनाथांचा बाप बनला.. शंकरबाबा पापळकरांना पद्मश्री

कोण आहेत शंकरबाबा पापळकर...
Padma Awards 2024 : अन् रस्त्याच्या कडेला इस्त्री करणारा तरुण शेकडो अनाथांचा बाप बनला.. शंकरबाबा पापळकरांना पद्मश्री

वझ्झर येथील आश्रमात सव्वाशे अंध, अपंग वा पूर्णंतः मतिमंद मुलांना जवळपास ३० वर्षांपासून आपल्या मायेच्या पंखाखाली घेणाऱ्या शंकरबाबा पापळकर यांना पद्‍मश्री सन्मान जाहीर झाला आहे. कुणी सार्वजनिक संडासच्या टाकीत, कुणी मुंबईच्या फलाटावर, कुणी अकोल्याच्या स्टेशनलगतच्या नाल्यात किंवा कचरापेटीत फेकून दिलेली अशी मुले त्यांच्या आश्रमात आहेत. या अनाथ मुलांच्या संगोपनाचे आणि पुनर्वसनाचे काम बाबा करत आहेत. पापळकर यांच्यासह प्रख्यात दिग्दर्शक राजदत्त यांना पद्मभूषण आणि नागपुरातील सुविख्यात मेंदुरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनाही पद्‍मश्रीने गौरविण्यात येणार आहे.

सन १९९२ मध्ये अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-चिखलदरा रोडवर वझ्झर फाटा येथे शंकरबाबांनी आश्रमाची स्थापना केली. बाबांनी आश्रमातील मुलांना आपले नाव दिले. एवढेच नव्हे तर एकूण बारा मुलांना नोकरी मिळवून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. एकेकाळी रस्त्याच्या कडेला टेबल टाकून त्यावर कपड्यांना इस्त्री करण्याचे काम ते करायचे. पुढे ‘देवकीनंदन गोपाला’ या नावाचे साप्ताहिकच काढले आणि त्याचे संपादक झाले.

गाडगेबाबांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या या नियतकालिकावर होता. या नियतकालिकाच्या कामासाठी एकदा मुंबईला गेले असताना त्यांना फलाटावर मतीमंदांमधील शक्तीची ओळख झाली आणि या अवलियाचा प्रवास सुरु झाला. पुढे १९९१ च्या दरम्यान नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये मुलगी सापडली. त्यांनी तिला आश्रमात आणले. आश्रमातील बालकांना त्यांनी मोठे केले, शिकवले आणि आयुष्याचा जोडीदार शोधून जन्मदात्याचे कर्तव्य पूर्ण केले.

बाबा केवळ या मुलांच्या संगोपनासाठीच झटत असतात असे नाही तर त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक असल्याचेही सांगतात. त्यासाठीच १८ वर्षांवरील अनाथ मतिमंद मुलांच्या पुनर्वसनासाठी भारत सरकारने कायदा करावा अशी त्यांची मागणी आहे. यासाठी ते मागील दोन तपापासून संघर्ष करत आहेत. बाबांनी आजपर्यंत जवळपास तीस जणांचे लग्न लावून देत दिव्यांगांच्या पुनर्वसनाचे सर्वोत्तम उदाहरण जगासमोर मांडले आहे.

या अवलिया बापाने याच मुलांच्या मदतीने आश्रमाच्या आसपासच्या २५ एकरांवरील उजाड माळरानावर जवळपास १५ हजार झाडांचे जंगलही तयार केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने त्यांना डीलिटने सन्मानित केले आहे.

या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे. आता १८ वर्षांवरील दिव्यांग मुलांना मरेपर्यंत आश्रमात राहण्याची परवानगी मिळावी ही माझी मागणी सरकार पूर्ण करेल अशी आशा आहे.

— शंकरबाबा पापळकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com