आयुक्त मुंढेंनी का लगावला सत्ताधाऱ्यांना टोला ? वाचा सविस्तर

 Why did Commissioner Mundhe attack the ruling party?
Why did Commissioner Mundhe attack the ruling party?
Updated on

नागपूर : मंत्र्यांच्या बैठकीत जे झालेच नाही, त्याची माहिती बाहेर दिली जात आहे. शहरात कोरोनाग्रस्तांसाठी दहा हजारापेक्षा जास्त बेड उपलब्ध आहेत. वास्तविकतेच्या खोलात जाऊन माहिती घ्यावी, त्यानंतरच बोलावं, माझ्यावर खोटे बोलण्याचा आरोप करण्याची कुणाची सवय असेल तर खुशाल आरोप करावा, असा टोला आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सत्ताधाऱ्यांना लावला.

मी सत्याला धरून जनहितार्थ निर्णय घेतो, खोटे बोलत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर दुकानदारांनी राजकारण करू नये, असे नमूद करीत आयुक्तांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचाही प्रयत्न केला. नुकताच झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी आयुक्तांवर शहरात उपलब्ध असलेल्या बेडबाबत मंत्र्यांना खोटी माहिती दिल्याचा आरोप केला होता.

आयुक्तांनी फेसबुक लाइव्हद्वारे संवादादरम्यान एका नागरिकाने यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सत्ताधाऱ्यांना खोटे बोलण्याची सवयच झाली असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी शहरात ८०८६ बेड उपलब्ध आहेत. राधास्वामी सत्संग न्यासमधील पाच हजार बेडचा यात समावेश केल्यास १३ हजार बेड होतील, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. बेडच्या उपलब्धतेबाबत मी खोटे बोलत नाही. परंतु काहींचा खोटारडेपणाचा आरोप करण्याचा स्वभावच झाला आहे, असा टोला त्यांनी कुणाचेही नाव घेता लगावला.

माझी सत्याला धरून चालण्याची सवय आहे. माझ्यावर कुणी खोटारडेपणाचा आरोप करीत असेल तर ती त्यांची सवय असेल, अशी टोलेबाजी करीत त्यांनी वास्तविकतेला ‘ट्‍विस्ट'` करून जे मंत्र्यांच्या बैठकीत झालेच नाही, त्याबाबत चुकीची माहिती दिली जात असल्याचे सांगितले. वास्तविकतेच्या खोलात जाऊन बोलाव, असेही ते म्हणाले. कोविड केअर सेंटरमध्ये दहा हजारपेक्षा जास्त बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे लोकांची दिशाभूल करणे, चुकीचे आरोप लावणे बंद करा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

वास्तविकता मानायचीच नाही, केवळ आरोप करणे अन् खोटे बोलणे कुणाची सवय असेल त्याला उपाय नाही, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी व्यवसायाची नोंदणी नियमाप्रमाणे होत असून या अंमलबजावणीत कुणी अडथळा निर्माण करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. मुळात अनेक व्यापारी संघटनांनी याबाबत महापौरांची भेट घेतली होती. त्यामुळे हा इशारा महापौरांना तर नाही ना? अशी चर्चाही रंगली आहे.

एवढेच नव्हे महापौरांनी दुकानदारांना कर्मचाऱ्यांच्या तपासणीबाबत आयुक्तांनी लादलेल्या अटींचाही विरोध केला. आयुक्तांनी चाचणी करावीच लागेल, अशी भूमिका आज जाहीर करीत महापौरांना पुन्हा डिवचल्याचे चित्र आहे. पाणी दरात ५ टक्के वाढ रद्द करणे तसेच मालमत्ता करातून सूट देण्याची मागणीही फेटाळून लावली. याबाबतची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली होती.

‘प्रत्येकाच्या घरी डॉक्टर पाठविणे शक्य नाही`
नागरिक नियम पाळत नाही अन् प्रशासन झोपले आहे काय? असा उलट प्रश्न विचारला जात असल्याची खंत आयुक्तांनी व्यक्त केली. अनेक रुग्ण घरी उपचारासाठी आहेत. प्रत्येकाकडे डॉक्टर पाठविणे शक्य नाही. त्यामुळे घरी उपचार करणाऱ्यांनी ताप तसेच ऑक्सिजनची तपासणी घरीच करावी, असा सल्ला त्यांनी दिला. एवढेच नव्हे नागरिक एकदा कोरोना चाचणी केल्यानंतर पुन्हा चाचणी करीत असल्याबाबत आश्चर्य व्यक्त करीत त्यांनी एकदा पॉझिटिव्ह अहवाल आला तर तो रुग्ण पॉझिटिव्हच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. बेडची उपलब्धता असून नागरिकांना कोरोनासंदर्भातील नियम पाळावे, असे आवाहनही त्यांनी केले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com