शेकडो वर्षांनंतर विदर्भात रानटी हत्तीचा मुक्काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Elephant
नागपूर : शेकडो वर्षांनंतर विदर्भात रानटी हत्तीचा मुक्काम

नागपूर : शेकडो वर्षांनंतर विदर्भात रानटी हत्तीचा मुक्काम

नागपूर : ओडिशातून (Odisha)भरकटलेला सुमारे २३ हत्तींचा(23 elephants) कळप छत्तीसगडमार्गे (Chhattisgarh)दोन महिन्यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात आला होता. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात या कळपाने चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर आला होता. वनखात्याच्या उत्तम समन्वय आणि व्यवस्थापनामुळे दोन महिन्यांपासून ते आता गडचिरोलीत स्थिरावले आहेत. शेकडो वर्षानंतर विदर्भात पुन्हा एकदा रानटी हत्ती आले आहेत.

ओडिशातून आलेल्या हत्तींनी सुरुवातीला शेतात धुमाकूळ घालून शेतपिकाचे नुकसान केले. मात्र, त्यानंतर कोणतीही अनुचित घटना घडली नाही. दक्षिण धानोरा परिक्षेत्रात कन्हारटोला, मुंजारकुंडी, सिसुर या गावालगतच्या १८०० हेक्टर क्षेत्रात सरासरी २० ते २१ हत्तींचा कळप आहे. आतापर्यंत एक लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसानभरपाई वनखात्याने शेतकऱ्यांना दिली आहे. ओडिशातून आलेल्या हत्तीमुळे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासन वनखात्याला सहकार्य करत आहेत. ट्रॅप कॅमेरे व ड्रोनचा वापर करून हत्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे.

दीर्घकालीन उपायांसाठी नजीकच्या जंगलात पाण्याचे स्रोत तयार करणे, विविध रोपांची लागवड करणे, गावामध्ये प्राथमिक बचाव पथक तयार करणे यासारख्या उपाययोजना करण्यात येत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून हत्तींनी हा अधिवास स्वीकारल्याने तो सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने लागणाऱ्या खर्चासाठी गडचिरोली उपवनसंरक्षकांनी रुपये १.४ कोटीचा प्रस्ताव सादर केला आहे.

गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील दरेकसा, राजोली, टिपागड, भामरागड हा हत्तीचा अधिवास म्हणून उपयुक्त ठरू शकतो, असेही स्वयंसेवींचे म्हणणे आहे. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्याच्या सीमेत कधी दोन तर कधी तीन हत्ती येत आहेत, पण शेकडो वर्षांनंतर विदर्भात रानटी हत्ती एवढ्या मोठ्या संख्येत आले आहेत.

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात वैनगंगा नदीच्या पात्रात रात्री साडेदहाच्या सुमारास हत्तींचा हा कळप आढळून आला. नदी पात्रालगच्या पिंपळगाव, खरकाडा, नीलज या गावात ते दिसून आले. ब्रम्हपुरी वनखात्याची चमू त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. अवघ्या काही तासातच पहाटे दोन-तीन वाजताच्या सुमारास हा कळप याच वैनगंगा नदीच्या पात्रातून पुन्हा गडचिरोलीकडे परतला. ७२ तासांपासून हत्तींचा कळप सावलखेडा गावात आहे. चंद्रपूर व गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक तसेच ब्रम्हपुरी, वडसा उपवनसंरक्षक व तीन ते चार सदस्यांची समर्पित चमू ट्रॅकर्सच्या माध्यमातून या कळपावर लक्ष ठेवून आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :NagpuranimalElephant