मित्राच्या पत्नीवरच वारंवार बलात्कार, पतीला सोडण्यासाठी तगादा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape

मित्राच्या पत्नीवरच वारंवार बलात्कार, पतीला सोडण्यासाठी तगादा

नागपूर : मित्राच्या घरी गेल्यानंतर त्याच्या बायकोशी जवळीक साधून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पतीला सोडल्यास लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार करणाऱ्या युवकाविरूद्ध वाठोडा पोलिसांनी (wathoda police nagpur) गुन्हा (Nagpur Crime News) दाखल केला. अभय सुरेश जयस्वाल (२८, राजेंद्रनगर, नंदनवन झोपडपट्टी) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित ३० वर्षीय महिला रिया (बदललेले नाव) हिच्या पतीशी अभय जयस्वालची मैत्री होती. त्यामुळे तो गेल्या २०१९ पासून मित्राच्या घरी येत होता. रियाला पाच वर्षांचा मुलगा आहे, तर अभय अविवाहित आहे. अभय आणि रिया एकाच इंशुरन्स कंपनीत नोकरीला आहेत. त्यामुळे त्यांचे घरी येणे-जाणे होते. अभयची वाईट नजर रियावर गेली. तो मित्राला भेटायला येण्याच्या बहाण्याने वारंवार घरी यायला लागला. मित्राचा त्याच्यावर विश्‍वास होता. त्यामुळे त्याच्या वागण्यावर संशय आला नाही. यादरम्यान रिया आणि पतीचा घरगुती कारणावरून वाद झाल्यास अभय हा तिला आधार देत होता. तसेच मित्राचीही समजूत घालत होता. यादरम्यान त्याने रियाशी जवळीक साधली. मित्र घरी नसताना तो तिच्या घरी यायला लागला. तसेच तिला ऑफिसमध्ये सोडणे किंवा तेथून घरी आणून द्यायला लागला. त्यामुळे रिया आणि अभयची मैत्री झाली. पतीशी वाद वाढत गेल्यामुळे तिला अभयने आधार दिला. त्यामुळे अभयवर तिचा विश्‍वास बसला. रियाच्या याच विश्‍वासाचा गैरफायदा अभयने घेतला. २०१९ मध्ये घरी कुणी नसताना रियाला त्याने प्रेमाची कबुली दिली आणि शारीरिक संबंधाची मागणी केली. त्यावेळी रियाने विवाहित असून मुलगा असल्याचे सांगितले. त्यानंतरही त्याने तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

वारंवार लैंगिक शोषण -

पहिल्यांदा झालेल्या चुकीमुळे रियावर अभय दबाव टाकायला लागला. तिला वारंवार शारीरिक संबंधाची मागणी करायला लागला. वस्तीत दोघांच्या अनैतिक संबंधाची चर्चा पसरल्यामुळे रियाने वैवाहिक जिवनाचा विचार करीत त्याला नकार दिला. त्यामुळे अभयने तिला पतीला सोडल्यानंतर लग्न करू अशी अट घातली. त्यामुळे त्याच्या आमिषाला ती बळी पडली. गेल्या तीन वर्षांपासून तो तिचे लैंगिक शोषण करीत असून लग्नाचा विषय निघाल्यास टाळाटाळ करीत होता.

लग्नास दिला नकार -

अभयने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. महिलेने त्याला लग्न कर असे म्हटले असता तो वेळ मारून नेत होता. १५ नोव्हेंबर रोजी रियाने त्याला आपल्या घरी बोलावून लग्नाबद्दल विचारणा केली असता त्याने स्पष्टपणे नकार दिला. ‘मी फक्त टाईमपास करीत होतो’ असे त्याने तिला म्हटले. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी अभय जयस्वालवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Nagpurcrime