esakal | 'या' कारणांमुळे महिलांना हवाय घटस्फोट, 'भरोसा सेल'मध्ये तक्रारींचा पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

divorce-couple.jpg

'या' कारणांमुळे महिलांना हवाय घटस्फोट, 'भरोसा सेल'मध्ये तक्रारींचा पाऊस

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : साहेब...चार वर्षे झाले लग्नाला. पती पुण्यातील नामांकित आयटी कंपनीत नोकरीला आहे. आता त्याने अश्‍लील फोटोंच्या वेबसाईटचे काम सुरू केले आहे. त्याला महिलांपेक्षा पुरूषांमध्ये रूची आहे. माझ्यासाठी पतीकडे वेळ नाही तर घरात मित्रांना बोलावून त्यांना वेळ देतो. दारू पिऊन मारझोड करीत माझ्याच चारित्र्यावर संशय घेतो. आता मला हा त्रास असह्य झालेला आहे. त्यामुळे मला पतीसोबत राहायचे नाही. मला घटस्फोटच (divorce) पाहिजे. सोशल मीडिया, कोरोना काळातील पुरूषांच्या बदलत्या सवयी आणि वर्तनाचे स्त्रीविरोधी कंगोरे बाहेर पडत आहेत. पतीच्या नानातऱ्हेच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून ‘आम्हाला घटस्फोट हवा आहे’ अशी मागणी तक्रार निवारण केंद्रात (bharosa cell nagpur) अनेक महिलांनी केली आहे. (women demand divorce in bharosa cell of police in nagpur)

हेही वाचा: निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या सदस्यास मारहाण

भरोसा सेलमधील तक्रार निवारण शिबीरात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी महिलांची गाऱ्हाणी ऐकून घेत निर्णय दिला. आयुक्तांनी काही प्रकरणात समूपदेशनानंतर त्वरित गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. गेल्या काही दिवसांपासून भरोसा सेलला मरगळ आली असून तक्रारींचा निपटारा लवकर होत नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. प्रकरणांचा ताबडतोब निपटारा करा. कोणत्याही तक्रारीत गुन्हा दाखल होण्यासंदर्भात माहिती असेल तर ताबडतोब गुन्हा दाखल करण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्याकडे पाठवा, असे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले. यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी आणि पोलिस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने उपस्थित होते.

पतीचे अनैतिक संबंध -

''माझे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले. काही दिवसांतच पतीच्या वागण्यात बदल झाला. त्याचे एका युवतीशी आठ वर्षांपासून प्रेम प्रकरण आहे. त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. परंतु, आईवडीलांचा विरोध असल्याने त्यांचे लग्न होऊ शकले नाही. आता तो मला दारू पिऊन मारझोड करतो, घरातून वारंवार बाहेर काढतो. प्रेयसीला घरी आणतो आणि माझ्यासमोरच तिचा लाड करतो. सासूनेही हात वर करीत मुलाकडून भाग घेतला. यात आयुक्तांनी ताबडतोब पती आणि त्याच्या प्रेयसीला बोलावून समूपदेशन करीत संसार तुटण्यापासून वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश दिले''.

ॲसीड फेकण्याची धमकी देतो

''मी नर्स आहे. माझ्या पहिल्या पतीच्या निधनानंतर दुसरे लग्न केले. दुसरा पती दारू पिऊन मारझोड करतो. माझ्या तरुण मुलीलाही मारतो. त्याला विरोध केल्यास चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी देतो. त्याला जुगाराचे व्यसन आहे. त्यासाठी माझे पैसे चोरतो. हॉस्पिटलमध्ये येऊन डॉक्टर आणि स्टॉफशी वाद घालतो. आता हॉस्पिटल प्रशासनाने हात वर करीत पती पुन्हा हॉस्पिटलमध्ये आल्यास नोकरीवरून काढण्याची तंबी दिली आहे.''

चारित्र्यावर घेतो संशय -

''माझ्या लग्नाला ७ वर्षे झाले आहेत. पतीचा भिवसेनखोरीत अवैध दारूविक्रीचा धंदा आहे. वेगवेगळ्या प्रकारचे ग्राहक दारू पिण्यासाठी घरी येतात. पती माझ्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करतो. प्रत्येक ग्राहकासोबत अनैतिक संबंध असल्याचा आळ घेऊन जीवे मारण्याची धमकी देतो. गिट्टीखदान ठाण्यात गेल्यावर सुनावणी होत नाही. पती सुसाईड करण्याची धमकी देतो. अनेकदा बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करतो. मला घटस्फोट पाहिजे'', अशी कैफियत एका महिलेने मांडली

सलग दोन दोन तास मारहाण

''पतीला लग्नाच्या पूर्वीपासून दारूची सवय आहे. कामधंदा करीत नसून केवळ दारू पिऊन घरात धिंगाणा घालतो. क्षुल्लक कारणावरून रूमध्ये कोंडून दोन-दोन तास हाती सापडेल त्या वस्तूने मारहाण करतो. सासरचे हस्तक्षेप करीत नाहीत. पतीच्या वर्तनात सुधारणा होण्याची काहीच चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे मला घटस्फोट हवा'', अशी तक्रार एका महिलेने केली.

महिलांच्या तक्रारी

  • पती मारझोड करतो

  • पतीला पुरूषाचेच अधिक आकर्षण

  • पती चारित्र्यावर संशय घेतो

  • माहेरशी नाते तोडण्यास सांगतो

  • पतीचे अनैतिक संबंध आहेत.

  • सून आणि मुलगा घरात ठेवायला तयार नाही

  • सासरचे हुंडा आणायला सांगतात

  • पती जॉब सोडण्यासाठी मारहाण करतो

  • पती मुलांचा सांभाळही करीत नाही आणि खर्चही देत नाही

loading image