esakal | अर्ध्यावरच प्रेमाचा संसार मोडून गेली, डेंगीने घेतला बळी
sakal

बोलून बातमी शोधा

taraka pillewan

अर्ध्यावरच प्रेमाचा संसार मोडून गेली, डेंगीने घेतला बळी

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : गेल्या १५ वर्षांपूर्वी प्रेम जुळलं...घरच्यांचा विरोध होता. पण, विरोध पत्करून लग्न केलं...संसाराच्या वेलीवर एक वर्षापूर्वीच फुलंही उमललंय...पण, नियतीच्या मनात काय होतं कोणास ठाऊक...तिच्यावर डेंग्युने (nagpur dengue cases) घाव घातला आणि अर्ध्यावरच प्रेमाचा संसार मोडून ती निघून गेली. ती ढिसाळ आरोग्य व्यवस्थेचा बळी ठरल्याचा आरोप केला जातोय.

हेही वाचा: डेंगी अमरावतीत, मच्छरदाण्या नागपुरात धूळखात

तारका पिल्लेवान (३० वर्ष), असे मृत महिलेचे नाव आहे. तिचे पती प्रलय पिल्लेवान हे झोपडपट्टीत राहून शिकले. त्यांच्या वडिलांनी चादरी विकून शिकविलं. लहानपणीच प्रलय आणि तारकाचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. प्रलय शिकून इंडियन एअरफोर्समध्ये नोकरीवर लागला. त्यानंतर दोघांनाही लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तारकाच्या घरून लग्नाला विरोध होता. तरीही दोघांनी लग्न केलं. आता त्यांना एक वर्षांचा मुलगाही आहे.

दरम्यान, प्रलयची अंदमानला बदली झाली. त्यामुळे तारका नागपुरातील कौशल्यायन नगर येथे सासू-सासऱ्यांसोबत राहत होती. गेल्या १० दिवसांपूर्वी तिला अचानक थंडी वाजून ताप आला. त्यानंतर वस्तीतील एका डॉक्टरला दाखविले. त्यांनी औषध देऊन घरी पाठविले. ताप कमी झाल्यामुळे तिला काही काळ बरं वाटलं. पण, डॉक्टरांनी चाचण्या करण्यास सांगितलं नाही. रविवारी अचानक तारकाला रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यानंतर तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तत्काळ दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासताच डेंग्यूची शक्यता वर्तविली. त्यानंतर चाचणी करण्याचा सल्ला दिला. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चाचणीची सोय नव्हती. त्यामुळे खासगीमध्ये डेंग्यूची चाचणी करावी लागली. रात्री उशिरा १ वाजता रक्ताचा अहवाल आला. त्यामध्ये प्लेटलेट कमी झाल्याचे निदर्शनास आले. पण, शासकीय रुग्णालयात मात्र प्लेटलेट देखील उपलब्ध नव्हत्या. प्लेटलेटसाठी धावाधाव केली. शासकीय रुग्णालयातील डॉक्टर सजल बन्सल यांनी स्वतःकडून खूप प्रयत्न केलेय. पण, शेवटी तारकाने जीव सोडला आणि मृत्यू झाल्यानंतर प्लेटलेट मिळाल्या. मृत्यू झाल्यानंतर प्लेटलेटचा काहीच फायदा नव्हता. त्यामुळे त्या प्लेटलेट शासकीय रुग्णालयालाच दान करण्यात आला. वस्तीतील डॉक्टरांनी सुरुवातीलाच डेंग्यूची चाचणी करण्याचा सल्ला दिला असता, तर आज तारकाचा जीव वाचला असता, अशी खंत तिच्या नातेवाईकांनी बोलून दाखविली.

पतीच्या हातावरच सोडला जीव -

तारका आणि प्रलयचे लहानपणापासूनचे एकमेकांवर खूप प्रेम होते. तारका आजारी हे कळताच तो दोन दिवसांपूर्वीच नागपुरात आला. रात्री शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर तारकाची प्रकृती खालावत गेली आणि तिने पतीच्या हातावरच जीव सोडला.

नागपुरात डेंग्यूची स्थिती गंभीर, तरी प्रशासन मात्र झोपेत -

विभागात डेंग्यूचा प्रकोप कायम असून गेल्या सात दिवसांत २८७ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे विभागातील आजपर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या अडीच हजार पार गेली आहे. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर २०२१ या सात दिवसात आढळलेल्या एकूण २८७ नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १६० रुग्ण हे नागपूर शहरातील आहेत. नागपूर ग्रामीणला ५६ रुग्ण आहेत. नागपूर विभागात आढळलेल्या डेंग्यूग्रस्तांची संख्या २ हजार ५०६ रुग्णांवर पोहोचली आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यातील आहेत. त्यात शहरी भागातील ९५०, ग्रामीणच्या ६८४ रुग्णांचा समावेश आहे. परंतु रुग्ण आढळणे सुरू होताच सर्वत्र फवारणी सुरू झाल्याने आता रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याचा आरोग्य विभागाचा दावा आहे. विभागात एवढे डेंग्यूग्रस्त आढळल्याच्या वृत्ताला पुण्याच्या आरोग्य संचालनालयातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. पण, डेंग्यू मृत्यू विश्लेषण समिती कोरोनाचे कारण देत बैठकच घेत नाही. त्यामुळे डेंग्यूचे मृत्यू लपविण्यासाठी ही समिती बैठक घेत नाही का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

loading image
go to top