मुलगी झाली म्हणून जन्मदात्रीच्या नावाने खडे फोडणे बंद करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

women empowerment save girl

मुलगी झाली म्हणून जन्मदात्रीच्या नावाने खडे फोडणे बंद करा

आज महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती प्रत्येक क्षेत्रात धडाडीने कार्य करीत आहे, असे असले तरी सर्वच ठिकाणच्या महिलांच्या बाबतीत हे खरे ठरणार नाही. कारण ग्रामीण, दुर्गम भागात आजही महिलांना चूल आणि मूल एवढ्यापुरते मर्यादित जीवन जगावे लागते.

मुलीचा जन्म झाल्याने जन्मदात्रीच्या नावे खडे फोडणारे आजही अनेक आहेत. महिला अत्याचाराच्या विरोधातील आंदोलनात मी सदैव अग्रेसर असते. त्याच दिशेने वाटचाल करणारे ‘सकाळ’चे ‘एक दिवा कन्येसाठी, तिच्या उज्ज्वल उद्यासाठी’ अभियान अतिशय चांगले आहे.

नवरात्रोत्सवाच्या काळात कन्यापूजन केले जाते. त्यामुळे खास मुलींच्या प्रगतीच्या दृष्टीने आयोजित केलेला हा उपक्रम अतिशय योग्य आहे. प्रत्येक महिला आणि कुटुंबाने या विधायक कार्यात हिरिरीने सहभागी झाले पाहिजे. कारण आमच्या चिमुकलीच्या जन्माचे स्वागत झाले, तिचा सन्मान झाला तरच खऱ्या अर्थाने आदिशक्तीचा गौरव केल्यासारखे होईल.

लोककल्याणाच्या कार्यात ‘सकाळ’चा नेहमीच पुढाकार असतो. यापूर्वीही ‘सकाळ’ने अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवून आपली सामाजिक बांधीलकी जपली. त्यामुळे ‘एक दिवा कन्येसाठी तिच्या उज्ज्वल उद्यासाठी’ अभियानात मी सहभागी झाले. तुम्हीसुद्धा लावणार ना एक दिवा तिच्यासाठी...

- नवनीत राणा, खासदार, अमरावती लोकसभा मतदारसंघ