esakal | Lockdown Effect : ठिय्या मजुरांची जगण्यासाठी धडपड, काम मिळत नसल्यानं उपासमारीची वेळ

बोलून बातमी शोधा

worker
Lockdown Effect : ठिय्या मजुरांची जगण्यासाठी धडपड, काम मिळत नसल्यानं उपासमारीची वेळ
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : छोट्या स्वरुपातील बांधकामे, पाइपलाइन, जुन्या घरांची डागडुजी आणि बागकामे दररोज ठिय्यांवर उपलब्ध असणाऱ्या मजुरांवर अवलंबून असतात. येथे देण्यात येणारी मजुरीही निश्चित नसते. वेळ आणि परिस्थिती पाहून दर ठरविला जातो. पण गेल्या एका वर्षापासून कोरोनामुळे (corona) सुरू झालेल्या लॉकडाउनच्या (lockdown) मालिकेमुळे शहरातील कामेच जवळपास ठप्प पडली आहेत. परिणामी, या मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांच्याकडे न सरकारचे लक्ष आहे ना कल्याणकारी संस्था आणि मंडळांचे. शहरात ठिय्या मजुरांची संख्या एका लाखाच्या घरात आहे. (workers not getting work due to lockdown in nagpur)

हेही वाचा: उपराजधानीत भडकले गॅंगवॉर; भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी महिलेसह दोघांवर तलवारीने हल्ला

शहरात छोटे-मोठे २५ ठिय्ये आहेत. प्रत्येक ठिकाणी शेकडो मजूर कामाच्या अपेक्षेने येतात. त्यातील बहुतेक कुशल कामगार असतात. बांधकाम कामगारांची मोठी संख्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. ठिय्या कामगारही त्या अंतर्गत येणे अभिप्रेत आहे. पण, नोंदणीसाठी असणाऱ्या अटींची पुर्तता होत नसल्याने बहुसंख्य ठिय्या मजूर नोंदणीच्या कक्षेत येऊ शकले नाही. परिणामी शासकीय मदतही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. कंत्राटदार किंवा बिल्डरकडील कामगारांच्या तुलनेत मिळणारा मोबदलाही कमी आहे. त्यात लॉकडाउनमुळे गेले संपूर्ण वर्षच वाया गेले. यावर्षीही मार्च महिन्यापासून हार्डवेअरची दुकाने बंद असल्याने कामच मिळेनासे झाले आहे.

मोठ्या उमेदीने हे कामगार रोज ठिय्यावर येतात. दुपारी २, ३ पर्यंत थांबूनही काम मिळत नसल्याने हिरमुसले होऊन घरी परतावे लागते. महिन्यात एक- दोन दिवसच काम मिळते. उर्वरित दिवस हात रिकामेच असतात. गतवर्षी सामाजिक संस्था मदतीला आल्या होता. हक्काचे कल्याणकारी मंडळच मदत करीत नसेल तर इतरांकडून अपेक्षा करावी तरी कशी, असा भावनिक प्रश्न ठिय्या मजूर बादल सिरसाम यांनी उपस्थित केला.

नागपूर व विदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा

हेही वाचा: वादळानं पाळण्यातील बाळ १०० फूट उंच उडालं, आईनं फोडला एकच हंबरडा

सरकारी मदतीचा डागही नाही -

मागच्या सरकारने नोंदणीकृत बांधकाम मजुरांना ५ हजार रुपये आणि उपयोगी साहित्याची किट दिली. गत लॉकडाउनमध्येही ३-३ हजार दोनवेळा मिळाले. त्यांना भविष्य निर्वाह निधीसह अन्य मदतही देय आहे. आम्हाला मात्र दमडीही मिळाली नसल्याची कैफियत सीताराम बारापात्रे यांनी मांडली.

शहरातील मजुरांचे प्रमूख ठिय्ये -

महाल, मानेवाडा, सिग्नल चौक, कमाल चौक, पंचशील चौक, घाट रोड, छोटा ताजबाग, गिट्टीखदान, गड्डीगोदाम, राणी दुर्गावती चौक, जरीपटका, गोकुळपेठ, प्रतापनगर चौक, वाडी, नरसाळा रोड, म्हाळगीगनगर, सक्करदरा तलाव, खरबी चौक

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात कंत्राटदार, बिल्डर्सकडून प्रत्येक कामाच्यावेळी पैसे जमा केले जातात. यामुळेच हे सर्वात श्रीमंत मंडळापैकी एक आहे. ठिय्या कामगारांनाही तिथून मदत होणे अपेक्षित आहे. परंतु, कोणतीही मदत मिळाली नाही. अडचणीच्या या काळात दुजाभाव न करता सरकारने मदत देऊन त्यांना जगविले पाहिजे.
-विलास भोंगाडे, सरचिटणीस, महाराष्ट्र बांधकाम व लाकूड कामगार संघटना.