विदर्भातील वैशिष्टयपूर्ण झडत्याविना मुकामुका जाणार यंदाचा पोळा...

मेंढलाः पोळ्याच्या आदल्या सायंकाळी हळद, तूप लावून बैलांचे खांदे शेकण्यात येतात. उद्या बैलांना जेवायला येण्याचे आमंत्रण देताना शेतकरी.
मेंढलाः पोळ्याच्या आदल्या सायंकाळी हळद, तूप लावून बैलांचे खांदे शेकण्यात येतात. उद्या बैलांना जेवायला येण्याचे आमंत्रण देताना शेतकरी.

नांद (जि.नागपूर)  : आज बैलपोळा. शेतकऱ्यांचे वैभव असलेल्या बैलांविषयी कृतज्ञतेचा दिवस म्हणजे पोळा. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांची पिठोरी अमावस्येच्या दिवशी पूजा करून बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. आदल्या दिवशी बैलांच्या खांदेशेकणीचा कार्यक्रम असतो. बैलांचे खांदे तूप किंवा तेल हळद लावून शेकतात. 'आज आवतंन घ्या, अन् उद्या जेवायला या.' अशा शब्दात बैलांना पोळ्यांचे आमंत्रण दिले जाते. यंदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे पोळा झडत्यांविनाच जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडेल.  

अधिक वाचाः विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या मूर्तीचे वाढलेत भाव, हे आहे कारण…

अशा म्हटल्या जातात झडत्या...
पोळ्याचा आनंद शेतकऱ्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपरिक सणाचे स्वरूप बदलत असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्या म्हणण्याची लोकसंस्कृती आजही कायम आहे. पोळ्यात झडत्या आवर्जून म्हटले जातात. पोळ्यात म्हणण्यात येणाऱ्या झडत्या हा लोकसाहित्यातील महत्त्वपूर्ण भाग आहे.
'गणा रे गणा
गणा गेले वरच्या रानात,
रानातून आणली माती
थे दिली गुरूच्या हाती
 गुरूंना घडवला महानंदी
 तो नेला हो पोळ्यामंदी
 एक नमन गवळापार्वती
हर बोला हर हर महादेवऽऽऽऽ
"Z

अधिक वाचाः नागपूर जिल्हयातील एकमेव या ‘हॉटस्पॉट’ तालुक्यात आतापर्यंतची मृत्यूसंख्या ४२...

कृतज्ञता व्यक्त करणारा" पोळा" सण
सूर्यास्ताच्या वेळी गावाबाहेरील मोकळ्या जागेवर आम्रपानाच्या तोरणाखाली बैलांना उभे केल्यावर गावातील मान्यवर व्यक्तींचा मानाचा बैल येईपर्यंत पोळा फुटत नाही. ढोल-ताशांच्या गजरात शेतकऱ्यांनी सीमेवर बैल आणले की झडत्यांचा दुय्यम सामना सुरू होतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला बेगड, गेरू, गाठी, मठाट्या, घुंगरू, झूल आदी साहित्य बैलांच्या सजावटीसाठी वापरले जाते.
ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती असली तरी त्यातून सर्वसामान्य शेतकऱ्यांची परिस्थिती या झडत्यातून विषद व्हायची.
‘वाटी रे वाटीऽऽऽ
खोबऱ्याची वाटी
महादेव रडे दोन पैशासाठी
पार्वतीच्या लुगड्याले५६ गाठी
 देव कवा धावन गरिबासाठी
एक नमन गवरा पारबतीऽऽऽ हर बोला हर हर महादेवऽऽऽऽ

झडत्यांतून  पौराणिक दाखले  
नापिकीतही झडत्यांमधून परस्परांवर मात करून झडतीद्वारे आनंद घेतला जात असे. पोळ्यात अक्षता कपाळाला लावून एकमेकांना आलिंगन देऊन शेतकरी स्नेहभाव प्रकट करतात. पूर्वीच्या काळी गावातील पाटलांची बैलजोडी वाजत गाजत निघत होती.आता ही प्रथा काळाच्या ओघात लोप पावली.
‘बळी रे बळी लिंब बनी
अशी कथा सांगेन कोणी
राम-लक्ष्मण गेले हो वनी
 राम लक्ष्मणाने आणली बनफुले
ते महादेव पार्वतीच्या हाती ,३६० नंदी
एक नमन  गौरा पार्बती हर बोला हर हर महादेवऽऽऽऽ    
  
                   
याप्रकारे वर्णन करून अनेक पौराणिक दाखले झडत्यांतून देत असत. विविध विषयांवर झडत्या होत असल्या तरी पोळा फोडण्यासाठी विशेष झडती म्हटली जाते.
झिमूर झिमूर पाणी येते
बलकीदादा बैल राखे
बैलाची कान्हाळी, वाघाचा चौरा
झडती बोललास गुरुवाचाबळा
द्या हो बेलपाती,तोरणीचा झळा
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेवऽऽऽ"

पोळ्यातील झडत्या चिथावणीदार सुद्धा असतात. परंतू त्यातही आनंद असतो. आपल्या जुन्या वैमनस्यालाअशाप्रसंगी वाट मिळते. काही व्यक्ती या बाबी खेळकरपणाने स्वीकारू न शकल्याने कित्येकदा भांडण-तंटे होतात. आनंदी जीवनाकरिता हास्य आवश्यक असूनही विनोदी झडत्याद्वारे बैलांचा पोळा पुढच्या वर्षासाठी बघता बघता निघून जातो.
ससा रे ससा
पाहते कसा ?
त्याच्या पायात अडकला कसा
त्याची माय म्हणे काढू कसा
त्याचा बाप म्हणे राहूदे पोराले तसा
एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेवऽऽऽ"

‘आज आवतंन घ्या, अन् उद्या जेवायला या’...
 ग्रामीण भागातील शेतकरी पोळ्यात अक्षदा कपाळाला लावून एकमेकांना आलिंगन देऊन शेतकरी स्नेहभाव प्रकट करतात. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशीपासून पूर्वीसारखे रहाटगाडगे पुन्हा बैलांच्या नशिबी येते. तरी पोळ्याच्या आनंद शेतकऱ्यांसाठी सुखदायक असतो. या पारंपारिक सणाचे स्वरूपही बदलत असले तरी ग्रामीण भागात पोळ्याच्या दिवशी झडत्यांची लोकसंस्कृती आजही कायम आहे. ग्रामीण भागातील शेतकरी या संस्कृतीचे जतन करीत आहेत.

संपादन  : विजयकुमार राऊत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com