Video : मोबाईलवर बोलताना तोल गेला अन् पाण्यात बुडाला; तरुणासोबत घडली दुर्दैवी घटना

Youth dies after falling from bridge
Youth dies after falling from bridge

उमरेड (जि. नागपूर) : बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास  शहरापासून अगदी ४-५ किमी अंतरावर असलेल्या शिवापूर तलावाच्या पुलावरून तोल जाऊन युवक पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विलास काळे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. युवकाला शोधण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. युवकाचे नाव प्रवीण हंसराज मेश्राम असे आहे. तो चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील आडेगाव देश येथील रहिवासी असल्याचे मित्र अमोल रमेश चौधरी याने पोलिसांना सांगितले.

प्रवीण व त्याचा मित्र भिवापूरच्या एका गॅस एजन्सीत कार्यरत होते. ते कार्यालयीन कामासाठी कवडसी गावात गेले होते. त्यानंतर ते शिवापूर मार्गाने उमरेडच्या दिशेने जात असता वाटेत थोडा वेळ जलाशयाच्या पुलावर थांबले. प्रवीणला फोन कॉल आला. तो फोनवर बोलत असताना पुलाच्या तुटलेल्या सुरक्षकाठड्यावर बसला. त्याचा तोल गेला तसाच जवळच उभा असलेला मित्र अमोल यास ‘मला वाचवा’, अशी आर्त हाक देत पाण्यात कोसळला.

पोहता येत नसल्यामुळे तो तलावाच्या तळाशी जाऊ लागला. त्याचा मित्र अमोल याने पाण्यात उडी घेतली. परंतु, त्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्याने अमोल अश्रू ढाळत सर्व प्रकार सांगत होता. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांकडून प्रवीणला शोधण्याचे कार्य सुरूच होते. या पुलाचे बांधकाम हे साधारणतः २० वर्षांपूर्वी झालेले असून, पुलावरील सुरक्षा कठडे जागोजागी तुटलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात. पुलावर एक भगदाड पडलेले असून, पुलावरील रस्त्याची चाळण झालेली आहे. हेच तुटलेले कठडे अपघाताला आमंत्रण देत आहेत. तरीसुद्धा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचा गावकरी आरोप करीत आहेत.

घटना अत्यंत दुर्दैवी
ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पुलावरील तुटलेल्या बॅरिगेडची डागडुजी करण्यास तसेच त्यावरील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे आदेश दिले आहे.
- राजू पारवे,
आमदार, उमरेड

प्रशासनाचे दुर्लक्ष
पुलाचे बांधकाम वीस वर्षे जुने आहे. सद्यःस्थितीत त्या पुलावरील कठडे जागोजागी तुटलेले आहेत. काही जागी भगदाड पडले आहेत. रस्त्यात मोठे खड्डे आहेत आणि हे सर्व अपघाताला आमंत्रण देतात. मात्र, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. 
- संजय वाघमारे,
माजी सरपंच, नवेगाव (साधू)

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com