विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड, वाचा अभियानाबद्दल

Nai disha for girls in corporation school
Nai disha for girls in corporation school

नागपूर ः स्त्री आणि त्यांचे मासिक आरोग्य याविषयी अजूनही पुरेशी जागरुकता निर्माण झालेली नाही. शालेय विद्यार्थिनींना मासिक धर्माच्या काळातील स्वच्छता, सॅनिटरी पॅडचा वापर आणि त्याची विल्हेवाट याविषयीचे मार्गदर्शन अत्यावश्‍यक आहे. विशेषत: महानगरपालिकेच्या शाळांमधील मुलींसाठी तर ते विशेषच महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेऊन आम्ही आमच्या आरोग्यासाठी या स्वयंसेवी संस्थेने "नई दिशा' हे अभियानच हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत महानगरपालिकांमधील 28 शाळांतील साडेतीन हजारांवर विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड पुरविण्यात येणार आहे.

मनपाच्या सानेगुरुजी उर्दू माध्यमिक शाळेत "आम्ही आमच्या आरोग्यासाठी' या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने "नई दिशा' अभियानांतर्गत जनजागृती करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गिऱ्हे, मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चापलेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रद्धा वाशीमकर, "आम्ही आमच्या आरोग्यासाठी' संस्थेच्या नसरीन अन्सारी, मंगला घोडेस्वार, अर्चना जोशी उपस्थित होत्या.

संस्थेने मनपाच्या शाळांमधील किशोरवयीन मुलींच्या समस्या, त्यासाठी जनजागृती, आवश्‍यक बाबी यासंदर्भात सर्वेक्षण केले. त्यानंतर किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी शाळांमध्ये काय सुविधा असाव्या, याबाबत प्रस्ताव तयार केला. शाळेत सॅनिटरी पॅडचा नियमित पुरवठा करावा, सॅनिटरी पॅड विल्हेवाटीसाठी "डिस्पोजल युनिट' हवे, स्वच्छतागृहांमध्ये पाणी व स्वच्छतेची सोय, मुलींसाठी पुरेशी सुरक्षित व्यवस्था असावी, मासिक पाळीविषयक आरोग्य संबंधाने सल्ला व समुपदेशन व्यवस्था असावी, शिक्षण विभागाने मासिक पाळी स्वच्छतेकरिता शाळास्तरावर सुविधा उपलब्ध करण्याकरिता अर्थसंकल्पात तरतूद करावी, असे या प्रस्तावात संस्थेने सुचविले होते.

यावर अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सॅनिटरी पॅडची विल्हेवाट योग्यप्रकारे लावता यावी यासाठी प्रत्येक शाळेत डिस्पोजल युनिट लावणार असल्याची माहिती दिली. संस्थेने दिलेल्या प्रस्तावाचे स्वागत करीत सॅनिटरी पॅडसाठी पुढील अर्थसंकल्पात तरतूद करण्याची ग्वाही त्यांनी दिली. शाळांमधील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेबाबत स्वत: लक्ष घालणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. किशोरवयीन मुलींसाठी वेळोवेळी समुपदेशन आणि मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. वापरानंतर विल्हेवाटीसाठी प्रत्येक शाळेत सॅनिटरी पॅड डिस्पोजल युनिटही लावण्यात येईल. "नई दिशा' अभियानांतर्गत किशोरवयीन विद्यार्थिनींना मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

असे आहे अभियान

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागात कार्यरत "आम्ही आमच्या आरोग्यासाठी' संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांच्या आरोग्याबाबत विविध प्रकल्प राबविले जातात. "नई दिशा' प्रकल्प किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कसे असावे यासाठी जनजागृती व मार्गदर्शन करण्यासाठी राबविला जातो. ऑगस्ट 2019 मध्ये मनपासोबत या प्रकल्पाची सुरुवात झाली असून, मनपा संचालित 28 शाळांमध्ये प्रकल्प राबविण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com