अमरावती - देश-विदेशातील स्थलांतरित पक्षांसाठी काही काळ मुक्कामाचे ठिकाण असलेला नल-दमयंती सागर सध्या अबोल झाला आहे. ही बाब पक्षिमित्रांच्या मनाला प्रचंड बोचत असून दुष्काळी स्थितीचा हा परिणाम त्यांना वेदनादायक ठरत आहे..पक्षिमित्र तसेच पर्यावरणवादी प्र. सू. हिरूरकर यांनी या जलाशयाच्या परिसरात निर्माण झालेल्या गंभीर स्थितीची माहिती दिली. १५ नोव्हेंबर रोजी ते मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाच्या परिसरात पोहोचले. सिंभोरा धरणाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याने डावीकडे आयटीआयच्या मागील बाजूस त्यांनी निरीक्षण सुरू केले. येथे दरवर्षी हिवाळ्यात गल, राजहंस, नदी सुरय, गॉडविट, आर्ली आदी नानाविध पक्ष्यांची मांदियाळी राहते. पक्ष्यांचे थवेच्या थवे अन्न शोध कार्यक्रमात येथे गुंतलेले असतात..मात्र यावर्षी धरणाच्या कोरड्या काठाकाठाने बरीच भटकंती करूनही अजिबात स्थलांतरित पक्षी दिसून आले नाही. धरणातील पाण्याची पातळी आणि काठ जवळपास एक-दोन किलोमीटर पलीकडे म्हणजे आत सरकली आहेत. त्यामुळे चोहीकडे शुकशुकाट पसरला आहे. दोन हळदी-कुंकू पक्ष्यांचे कुटुंब, तीन शेकाट्या, दोन उघड्या चोचीचे करकोचे आणि चार टिटव्या एवढेच काय ते पक्षी दिसले. त्यामुळे नल-दमयंतीचा आवाज कुठे हरवला? असा प्रश्न त्यांना निर्माण झाला..यावर्षी मॉन्सूनने महाराष्ट्राच्या बऱ्याच भागाला पाठ दाखविल्याने जवळपास चोहीकडे हेच चित्र निर्माण झाले आहे. पाण्याविना शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सर्वत्रकडे दुष्काळ पडला आहे.पृथ्वीचे वाढते तापमान, एल निनो आणि ग्लॅशीयरच्या वितळण्यामुळे दिवसेंदिवस नैसर्गिक आपत्तीत फार मोठी भर पडत चालली आहे. हे सर्व मानवाने तीन-चार दशकांपासून आपल्या विकासाकरिता आणि स्वार्थासाठी केलेली निसर्गाची अपरिमित हानी, यामुळे घडत आहे, यात तीळमात्र शंका नाही. एकप्रकारे मानवानेच मानवाचा केलेला हा घात आहे..नाही तर हिवाळ्यात प्रत्येक जलाशयावर होणारी परदेशी स्थलांतरित पक्ष्यांची गर्दी एकाएकी कशी कमी झाली? नल-दमयंती सागराची आजची परिस्थिती पाहून मन अतिशय खिन्न झाले. शेकडो पक्ष्यांच्या उपस्थितीतीने नल-दमयंती सागराला जिवंत करणारे पक्षी आज गेले कुठे? नल-दमयंती आज अबोल का झाला, असा प्रश्न प्र. सू. हिरूरकर यांनी उपस्थित केला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.