शाब्बास ! काटोलच्या ग्रामस्थांची नावे पोहोचणार मंगळावर!

सुधीर बुटे
सोमवार, 2 डिसेंबर 2019

  • "नासा'तर्फे ऑनलाइन बोर्डिंग पास प्राप्त
  • देशातील पहिले गाव काटोल तालुक्‍यात
  • 100 ग्रामस्थांची ऑनलाइन नोंदणी

काटोल (जि.नागपूर) ः या वाऱ्यावर बसुनी विमानी, सहल करू गगणाची ।
चला मुलांनो, आज पाहूया, शाळा चांदोबा गुरुजींची ।।
या गीताचे श्रवण न केलेले मिळणे कठीणच आहे. मात्र काटोल तालुक्‍यातील आदिवासी गोवारी बहुमूलक आलागोंदी गावातील जि.प.प्राथमिक शाळेतील 100 टक्‍के विद्यार्थी व ग्रामस्थांची शाळा भरणार थेट मंगळ ग्रहावरच! त्याकरिता नासातर्फे ऑनलाइन बोर्डिंग पासेसही प्राप्त झालेल्या आहेत. हे वाचून आश्‍चर्य वाटले ना? मात्र हे 100 टक्‍के बरोबर आहे.

अमेरिकेतील "नासा' या अवकाश केंद्राचे "मंगळ रोव्हर 2020' हे अंतरिक्षयान 2020 ला मंगळ ग्रहावर झेपावणार आहे. त्याचबरोबर "स्टेनसिल्ड चिप'वर आपली नावे पाठवून चंद्रावर आपल्या खुणा सोडण्याची संधी नासाने जगभरातील जनतेला दिलेली होती. नासाच्या कॅलिफोर्नियातील पॅसाडेना येथील जेट प्रॉप्लशन प्रयोगशाळेतल्या मॉक्रोडिव्हायसेस वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये इलेक्‍ट्रॉनिक बिमचा वापर करून सिलिकॉनच्या चिपवर मानवी केसाच्या एक हजारव्या भागाइतके अंदाचे 75 नॅनोमीटर रुंदीत आपण नोंदविलेली नावे "स्टेन्सिल' केली जाणार आहेत. अशा "ए' डेमी आकाराच्या चिपवर दहा लाख नावे मावतील. ही नावे चिपरोव्हरवर काचेच्या आवरणाखाली जतन करून मंगळ ग्रहावर 2020 ला पाठविली जाणार आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र रामहरी टेकाडे यांनी नागपूर येथील तंत्रस्नेही शिक्षक ओंकार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व तंत्रस्नेही शिक्षक धनंजय पकडे यांच्या सहकार्याने गावातील सर्व 100 टक्‍के ग्रामस्थांची ऑनलाइन नोंदणी केली. नुकत्याच ऑनलाइन बोर्डिंग पासेस उपलब्ध झाल्या. शाळेत विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना प्रोजेक्‍टरवर मंगळ ग्रहावरील रोव्हरच्या चित्रफिफती दाखवून ज्ञानात भर पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमासाठी 100 टक्‍के नोंदणी केलेले देशातील नव्हे तर जगातील एकमेव "आलागोंदी' गाव असल्याच्या दावा मुख्याध्यापक राजेंद्र टेकाडे यांनी केला आहे.
आलागोंदी ग्रामस्थांच्या नोंदीच्या वेळी जगभरातून 84,10,210 तर भारतातून 9,42,363 लोंकांनी नोंद केलेली होती.

5 ऑगस्टला मंगळाकडे झेप
"रोव्हर 2020' हे यान अँटलस व्ही 541 या रॉकेटच्या मदतीने अमेरिकेच्या फ्लोरिंडा प्रांतातील कॅपकानावेराल येथील सैन्यदलाच्या तळावरून 17 जुलै, 2020 ते 5 ऑगस्ट, 2020 या कालावधीत मंगळ ग्रहाकडे उड्डाण करणार आहे. फेब्रुवारी 2021 ला मंगळावर "रोव्हर 2020' यान पोहोचण्याची शक्‍यता आहे. संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदनी 30 सप्टेंबर2019पर्यंत करणे अनिवार्य होते.

आलागोंदीचे नाव जागतिक स्तरावर
आलागोंदी हे गोवारी आदिवासीबहुल गाव आहे. पोटाचा प्रश्न सोडविणे, हे त्यांचे प्रथम कर्तव्य असते. जागतिक घडामोडीबाबत ते अनभिज्ञ असतात. मात्र आलागोंदी गावाचे नाव जागतिक स्तरावर कसे पोहचेल, यासाठी प्रयत्न करीत असतात. शाळा व गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी नवनवीन उपक्रम राबवीत असतात.
राजेंद्र रामहरी टेकाडे
मुख्याध्यापक
जि. प. प्राथमिक शाळा, आलागोंदी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The names of the villagers of Katol will be reached on Mars!