भंडाऱ्यात नाना पटोलेंना कॉंग्रेसकडून हिरवी झेंडी? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागून खासदारकीचा राजीनामा देणारे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदासंघाचे माजी खासदार नाना पटोले यांनाच कॉंग्रेसने उमेदवारी देऊ केल्याची खात्रीलायक माहिती आहे. यामुळे नाना पटोले यांना भाजपऐवजी कॉंग्रेससाठी मते मागावी लागतील. 

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागून खासदारकीचा राजीनामा देणारे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदासंघाचे माजी खासदार नाना पटोले यांनाच कॉंग्रेसने उमेदवारी देऊ केल्याची खात्रीलायक माहिती आहे. यामुळे नाना पटोले यांना भाजपऐवजी कॉंग्रेससाठी मते मागावी लागतील. 

नाना पटोले मूळचे कॉंग्रेसचे आहेत. ते आमदारही होते. मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्‍न आणि विदर्भाच्या विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर ते भाजपात गेले. भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढले. यात त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांना पराभूत केले. यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी अपेक्षा होती. मात्र, मोदी यांनी बैठकीत अपमान केल्याचे सांगून त्यांनी भाजपविरोधात आघाडीच उघडली. जाहीर कार्यक्रमांमधून ते पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलायला लागले. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत गुजरामधील प्रचारत ते सहभागी झाले होते. कॉंग्रेसमध्ये रीतसर प्रवेश केल्यानंतर त्यांना प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

पटोले यांनी आपली ताकद यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये दाखवून दिली आहे. कॉंग्रेसकडे या मतदारसंघात त्यांच्या तोडीचा दुसरा उमेदवार नाही. आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीने राज्यसभेवर पाठविले. त्यामुळे ते लढण्यास इच्छुक नाहीत. यामुळे नाना पटोले यांच्याशिवाय आघाडीकडे दुसरा पर्याय नाही. अलीकडेच कॉंग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भंडारा-गोंदिया जिल्ह्यात चाचपणी केली. हे लक्षात घेता ही जागा कॉंग्रेस लढणार असल्याचे स्पष्ट होते. 

भाजपची प्रतिष्ठा पणाला 
भाजपकडून ओबीसी नेते खुशाल बोपचे आणि हेमंत पटले यांच्या नावाची चर्चा आहे. पटोले आणि बोपचे दोघेही ओबीसी समाजाचे नेतृत्व करतात. भाजपसाठी ही जागा राखणे प्रतिष्ठेचे आहे. यामुळे दोघांमध्ये चांगलीच टक्कर होण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादीतर्फे भाजपचे माजी ज्येष्ठ नेते महादेवराव शिवणकर यांचे पुत्र विजय शिवणकर यांचे नाव पुढे केले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nana patole congress nagpur news