
नागपूर : भंडारा-गोंदिया येथील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असल्याने दोन्ही काँग्रेसमध्ये चांगलाच तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील निकालावर नागपूर महापालिकेतील महाविकास आघाडीचे भवितव्य अवलंबून राहणार (future of Mahavikas Aghadi is in danger) आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) आणि राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल (praful patel) हे भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे प्रमुख नेते आहेत. राज्याच्या सत्तेत दोन्ही काँग्रेस एकत्र असली तरी या नेत्यांमध्ये दुरावा मात्र अद्यापही कमी झालेला नाही. पटोले यांनी लोकसभेच्या निवडणुकीत पटेल यांना पराभूत केले होते. त्यामुळे पटेलांना राज्यसभेत जावे लागले तर पटोले यांनी मध्येच भाजपला सोडून विधानसभेची निवडणूक लढली.
नागपूर येथील विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी पटोले यांनी पटेल यांना उद्देशून राष्ट्रवादीचे विदर्भातील एकमेव दुकान बंद करून असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर पटेल यांचे समर्थक चांगलेच भडकले होते. विधान परिषदेच्या निवडणुकी पटोले यांचा उमेदवार पराभूत झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पटोले यांचेच दुकान बंद झाले अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भंडारा-गोंदियाची निवडणूक होऊ घातली आहे.
दोन्ही काँग्रेस एकमेकांच्या विरोधात प्रचार करीत आहेत. कुठल्याही परिस्थितीत पटोले यांची बोलती बंद करण्याचे राष्ट्रवादीने ठरविले आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक होण्यापेक्षा दोन्ही काँग्रेसमध्ये स्पर्धा लागली आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून नाना पटोले (nana patole) मतदारसंघात कमी आणि नागपूरमध्ये जास्त स्वारस्य दाखवत आहेत. भंडारा जिल्ह्यात नावालाच येतात. ते भंडारा सोडणार अशाही चर्चा आहे. त्यामुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत लागले आहे.
प्रदेशाध्यक्षांच्या धरसोडीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली अस्वस्थता राष्ट्रवादीतर्फे कॅश केली जात आहे. थोडक्या मतांनी झालेला पराभव जिव्हारी लागल्याने माजी राज्यमंत्री परिणय फुके हेसुद्धा येथे शड्डू ठोकून बसले आहेत. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमुळे काँग्रेसचे सँडविच झाले आहे.
रद्द झालेल्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा फटका कुणाला बसतो यावरही बरेचकाही अवलंबून राहणार आहे. मंगळवारी पहिल्या टप्प्याचे मतदान आटोपले असून अंतिम निकालानंतर दोन्ही काँग्रेसमधील धुसफुस समोर येणार आहे. याचा परिणाम फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या नागपूर महापालिकेच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीवर होण्याची शक्यता आहे.