आता काय बोलावं? चक्क पोलिसच सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

योग्य माहिती सामान्यांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे सायबर गुन्हे वाढत असून नागरिकांची फसवणूक होत असल्याची चर्चा आहे. 

नागपूर : एका महिला पोलिस शियापाला क्रेडिट कार्ड बंद झाल्याचा भ्रमणध्वनी करून दीड लाखानी फसवणूक केली. ही घटना अंबाझरी पोलिस ठाण्यांतर्गत समोर आली. 

योगिता खंडाते (33, रा. दर्शन कॉलनी) असे शिपायाचे नाव असून त्या अंबाझरी पोलिस ठाण्यातच कार्यरत आहेत. त्या 9 ऑक्‍टोबरला ठाण्यात कामावर असताना त्यांना 8960230878 क्रमांकावरून फोन आला. यावेळी समोरच्या व्यक्तीने आपण मुंबई येथून बॅंक अधिकारी बोलत असल्याची बतावणी केली. त्यांचे क्रेडिट कार्ड बंद झाले असून ते पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. त्यांनीही समोरच्या व्यक्तीवर विश्वास टाकून वैयक्तिक माहिती सांगितली. याचा फायदा घेऊन त्यांनी 1 लाख 46 हजार 942 रुपये काढून घेतले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी साबयर सेलकडे तक्रार दिली. सायबर सेलने तपास करून प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव अंबाझरी पोलिसांना सादर केला. अंबाझरी पोलिसांनी फसवणूक व माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. 

जनजागृती केवळ "पब्लिसिटी स्टंट' 
सायबर गुन्हे घडू नये किंवा ऑनलाइन फसवणूक होऊ नये म्हणून नागपूर पोलिस जनजागृती करीत असतात. मात्र, चक्‍क पोलिस कर्मचारीच सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकल्यामुळे आता जनजागृतीबाबत संशय निर्माण झाला आहे. पोलिस असूनही फसत असतील, तर सामान्य नागरिकांचे काय? केवळ "पब्लिसिटी स्टंट' म्हणून जनजागृती करण्यात येत असून त्याबाबत योग्य माहिती सामान्यांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे सायबर गुन्हे वाढत असून नागरिकांची फसवणूक होत असल्याची चर्चा आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: napur, cyber crime, police, loot