esakal | बधाई हो बधाई! माता मृत्यू दर शून्यावर आणणाऱ्या वरोरा, मूल येथील उपजिल्हा रुग्णालयाला राष्ट्रीय पुरस्कार

बोलून बातमी शोधा

Mother.

उपजिल्हा रुग्णालय, मूल व उपजिल्हा रुग्णालय, वरोरा या संस्थांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने 2 लाख प्रती वर्ष असे सलग 3 वर्ष प्रसूतिगृह व शस्त्रक्रियागृह असे प्रती विभाग केंद्रशासनामार्फत निधी प्राप्त होणार आहे.

बधाई हो बधाई! माता मृत्यू दर शून्यावर आणणाऱ्या वरोरा, मूल येथील उपजिल्हा रुग्णालयाला राष्ट्रीय पुरस्कार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : बालमृत्यू आणि मातामृत्यू ही आजही विकसनशील भारताच्या सुदूर प्रांतातली गंभीर समस्या आहे. केंद्र आणि राज्य शासन आणि अनेक समाजसेवी डॉक्‍टर्स या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना अलिकडे पुरेसे यशही येऊ लागले आहे. त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे लेबर रुम कॉलिटी इम्प्रुव्हमेंट इनिशिएटिव्ह हा कार्यक्रम हाती घेण्यात आला.

यामार्फत संस्थेमधील प्रसूतिगृह, शस्त्रक्रियागृहांचा दर्जा उंचविण्याच्या दृष्टीने आयपीएचएस (इंडियन पब्लिक हेल्थ स्टॅंडर्ड) व एनक्‍यूएएस (नॅशनल कॉलिटी ऍश्‍युरन्स स्टॅंडर्ड) मानांकनानुसार मे-2018 मध्ये सुरू करण्यात आले. लेबर रुम कॉलिटी इम्प्रुव्हमेंट इनिशिएटिव्ह या कार्यक्रमांतर्गत उपजिल्हा रुग्णालय वरोरा आणि मूल या संस्थेस राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. .

लेबर रुम कॉलिटी इम्प्रुव्हमेंट इनिशिएटीव्ह या कार्यक्रमाचा मुळ उद्देश गर्भवती महिलांना सन्मानपूर्वक वागणूक देणे तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून प्रसूती सुरक्षितपणे करणे तसेच मातामृत्यु व बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे होय. या कार्यक्रमातंर्गत संस्थास्तरावर प्रसूती कक्ष व शस्त्रक्रियागृहाकरिता क्वॉलिटी सर्कल स्थापन करण्यात आले. त्यात वैद्यकीय अधीक्षक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, अधिपरिसेविका व परिसेविका यांचा समावेश करण्यात आला होता. क्वॉलिटी सर्कलमार्फत संस्थास्तरीय मूल्यमापन करून आरोग्य संस्थेतील त्रुटी काढण्यात आल्या. या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर जिल्हास्तरीय कोचिंग चमुमार्फत मुल्यमापन करण्यात आले. सदर मूल्यमापन अहवालानुसार 70 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण प्राप्त आरोग्यसंस्थांना राज्यस्तरीय मानांकनाकरिता पाठविण्यात आले.

सविस्तर वाचा - बेटा शिवसेना का पॉवर हैं.. अख्खा फॅमिली को उडा दूंगा

राज्यस्तरीय मानांकनाकरिता जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय मूल आणि उपजिल्हा रुग्णालय, वरोरा या आरोग्य संस्थाची निवड करण्यात आली. त्यानंतर या संस्थेची मानांकनानुसार पडताळणी करण्याकरिता केंद्रशासनामार्फत दोन सदस्यीय चमू पाठविण्यात आली. या चमूमार्फत उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे योग्य ती उपाययोजना व सुधारणा केल्याने तसेच मातामृत्यू दर शून्यावर आणल्याने तेथील प्रसुतीगृहाला व शस्त्रक्रियागृहाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. उपजिल्हा रुग्णालय, मूल व उपजिल्हा रुग्णालय, वरोरा या संस्थांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने 2 लाख प्रती वर्ष असे सलग 3 वर्ष प्रसूतिगृह व शस्त्रक्रियागृह असे प्रती विभाग केंद्रशासनामार्फत निधी प्राप्त होणार आहे.