esakal | राष्ट्रीय महामार्गाच्या कामांनी घेतली गती
sakal

बोलून बातमी शोधा

national higway

तब्बल महिनाभराच्या ब्रेकनंतर केंद्र शासनाने प्रतिबंधित क्षेत्राबाहेर विकास कामे सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार अकोला विभागातील राष्ट्रीय महामार्गाच्या 10 जुन्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या कामांनी घेतली गती

sakal_logo
By
मनोज भिवगडे

अकोला : कोरोना विषाणू कोविड-19 च्या संसर्गामुळे देशात 24 मार्चपासून लॉकडाउन करण्यात आले. परिणामी देशभरातील विकास कामे ठप्प झाली. तब्बल महिनाभराच्या ब्रेकनंतर केंद्र शासनाने प्रतिबंधित क्षेत्राबाहेर विकास कामे सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार अकोला विभागातील राष्ट्रीय महामार्गाच्या 10 जुन्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. याशिवाय चार नवीन कामेही सुरू करण्यात आली. त्यावर दोन हजारांवर मजूर सध्या कार्यरत आहे.


जिल्हा व राज्य सीमा बंदीमुळे राष्ट्रीय महामार्गाची कामे थांबली होती. ऐन हंगामात कामे थांबल्याने मजुरांच्या हाताला कामच शिल्लक नव्हते. ज्यांना शक्य झाले त्यांनी गाव जवळ केले. काही मजूर कामाच्या ठिकाणीच कसेबसे दिवस काढत होते. कंत्राटदार, स्वयंसेवी संघटना व शासकीय यंत्रणांकडून मिळालेल्या आधारावर या मजुरांनी महिना काढला. आता त्यांचे चांगले दिवस येऊ लागले आहेत. केंद्र शासनाच्या परवानगीनंतर प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या 20 एप्रिलपासून अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात येणाऱ्या दहा राष्ट्रीय महामार्गाची काही अंशतः कामे सुरू करण्यात आली आहे.


या कामांना झाली सुरुवात
राष्ट्रीय महामार्गावरील छोटे पूल, मातीकाम, रुंदीकरण व डांबरिकरणाची कामे काही प्रमाणात सुरू करण्यात आली आहेत. मजुरांची संख्या मर्यादित असल्याने सुरुवातीला छोट्या प्रमाणात कामांना सुरुवात करण्यात आली. मजूर त्यांच्या गावावरून कामावर पोहचू लागल्यानंतर कामांची गती वाढेल.


या मार्गाची कामे सुरू
- अकोला ते अकोट रोडवरील छोट्या पुलांची कामे
- अकोला ते अंजनगाव व परतवाडा रोड
- शेगाव-देवरी रोडचे माती काम
- चिखली-खामगाव मार्गावर उंद्री गावाजवळील पूल
- चिखली ते जालना रोडवरील काम
- मालेगाव-रिसोड, रिसोड-हिंगोली रोडचे काम
- मंगरूळपीर ते महान(जि. अकोला) रोडवरील पूल


या नवीन कामांना झाली सुरुवात
- शेगाव-संग्रामपूर, संग्रामपूर-खंडवा (मध्यप्रदेश सीमा)
- अकोला-महान रस्त्याचे रुंदीकरण
- खामगाव ते बुलडाणा रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण

मजुरांच्या उपलब्धतेनुसार कामाचे स्वरुप वाढविण्यात येणार
तीन दिवसापूर्वी काही कामे सुरू झाली असून, मजुरांच्या उपलब्धतेनुसार येत्या काही दिवसांत कामाचे स्वरुप वाढविण्यात येणार आहे. आता उपलब्ध तेवढ्या कामगारांच्या बळावर कामे सुरू करण्यात आली आहे.
- रावसाहेब झालटे, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग अकोला विभाग