esakal | निसर्गाची मुक्त उधळण असलेले हे स्थळ नेमके आहे तरी कोणते?
sakal

बोलून बातमी शोधा

muktagiri.

चारही बाजूंनी उंच पर्वतांच्या रांगा, दाट सावली देणारी मोठी झाडे, हिरव्यागार वेली, त्यावर रंगीबेरंगी फुले, सागवान वृक्ष, जवळच नागासारखी वळण घेत वाहणारी नाग नदी, तिचे उंचावरून दुधासारखे फेसाळत कोसळणारे पाणी, त्याचे अंगावर उडणारे तुषार

निसर्गाची मुक्त उधळण असलेले हे स्थळ नेमके आहे तरी कोणते?

sakal_logo
By
स्वप्नील वासनकर

करजगाव (जि. अमरावती) : जैन धर्मीयांचे सिद्धक्षेत्र मुक्तागिरी म्हणजेच दक्षिण भारताचे शिखरजी मेंढागिरीवर सध्या निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण सुरू आहे. चारही बाजूंनी उंच पर्वतांच्या रांगा, दाट सावली देणारी मोठी झाडे, हिरव्यागार वेली, त्यावर रंगीबेरंगी फुले, सागवान वृक्ष, जवळच नागासारखी वळण घेत वाहणारी नाग नदी, तिचे उंचावरून दुधासारखे फेसाळत कोसळणारे पाणी, त्याचे अंगावर उडणारे तुषार अशा मनमोहक दृश्‍यांनी मुक्तागिरी नटली आहे. परंतु कोरोनामुळे पर्यटकांचा हिरमोड झालेला आहे.

पूर्वीचे मेंढागिरी म्हणजेच आताची मुक्तागिरी याठिकाणी जैन धर्मीयांची पुरातन काळातील ५२ मंदिरे आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ही सर्वच मंदिरे वेगवेगळ्या शतकातील आहेत. काही पंधराव्या तर काही सोळाव्या शतकातील अति प्राचीन मंदिरे याठिकाणी आहेत.

४०० फूट उंच पर्वतावर ही मंदिरे वसलेली आहेत. ४०० फुटांवरून कोसळणारा धबधबा याठिकाणी पाहायला मिळतो. विशेष म्हणजे दहाव्या क्रमांकाचे मंदिर हे अकृत्रिम चैतालय म्हणून ओळखले जाते. या सर्व मंदिरांची निर्मिती एलिचपूरच्या पुढच्या (आत्ताचे अचलपूर) इल राजाने केली आहे. सुमारे एक हजार वर्षांपूर्वीची याठिकाणची भगवान पार्श्‍वनाथाची मूर्ती शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. आजही अष्टमी व पौर्णिमेला याठिकाणी केशर चंदनाचा वर्षाव होतो. मुक्तागिरीला पूर्ण पाहण्यासाठी ४०० पायऱ्या व उतरताना ५०० पायऱ्या लागतात. संपूर्ण लाकडापासून तयार केलेला रथ यात्रेच्या वेळी बाहेर काढला जातो.

दिवाळीनंतर येणाऱ्या पहिल्या पौर्णिमेला याठिकाणी मोठी यात्रा भरते. मुक्तागिरीचे संपूर्ण व्यवस्थापन हे पूर्वी धर्म पित्याकडे होते. प्रसिद्ध भटारक पद्मानंद स्वामी त्या धर्मपीठाचे पीठाधीश होते. भक्तांसाठी येथे निवासाची व्यवस्था आहे. भोजनालयसुद्धा याठिकाणी सुरू राहते. आजही याठिकाणी जैन धर्माच्या ऋषीमुनींची ये-जा सुरू असते. सध्या कोरोनामुळे याठिकाणी प्रवेशबंदी असली तरी देवाचे नीतीउपचार नित्यनेमाने सुरू आहेत.
संपादन - स्वाती हुद्दार

loading image
go to top