
अमरावती : कोरोनाच्या संकटाने साऱ्या जगाला वेढले असतानाही महिलांसंबंधीचे दुर्व्यवहार थांबण्याचे नाव घेत नाहीत. क्वारंटाईन सेंटरमध्येही अनेक मनोविकृत महिलांशी दुर्वर्तन करीत असल्याच्या अनेक घटना संपूर्ण विदर्भातून समोर येत असतानाच बडनेऱ्यात तर अत्यंत लाजीरवाणी घटना घडली. त्या घटनेवर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत असून संतापाची लाट उसळली आहे.
कोरोनाबाधितांचा आकडा जिल्ह्यात सातत्याने वाढत असल्याने त्याबाबत भीती व्यक्त होत असतानाच बडनेरा येथील रुग्णालयात लॅब टेक्निशियनने एका युवतीची आक्षेपार्ह तपासणी केल्याने हा मुद्दा आता जिल्ह्यात चांगलाच तापला आहे. विविध क्षेत्रांतील मंडळींकडून त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत असून गुन्हेगाराला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. ज्या रुग्णालयात ही घटना घडली त्या रुग्णालयाची काल तोडफोड करून नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला.
येथील मोदी रुग्णालयात एका युवतीचा कोरोना चाचणीसाठी थ्रोट स्वॅब घेतल्यानंतर लॅब टेक्निशियनने तिला अनावश्यक चाचणी करण्यास सांगून गैरवर्तन केले. त्यानंतर युवतीला आक्षेपार्ह संदेशही पाठवले. याप्रकाराची तक्रार पीडित मुलीने बडेनरा पोलिसात नोंदवली आहे. याप्रकरणाची पालकमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायद्याची जरब निर्माण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
गैरप्रकार खपवून घेणार नाही
मोदी हॉस्पिटलमध्ये घडलेला प्रकार अत्यंत घृणास्पद व निंदनीय असून सदर गुन्हेगारास कठोर शिक्षा मिळावी, असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. अशा समाजकंटकांवर कायद्याची जरब निर्माण करावी, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दिले. अनेकदा असे प्रकार घडले तरी मुली तक्रार करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे अशा प्रवृत्ती फोफावतात. त्यामुळे मुलींनी निर्भयपणे पुढे येऊन तक्रार दिली पाहिजे व गुन्हेगारी वृत्तीला वेळीच ठेचले पाहिजे. पालकांनीही याबाबत मुलींशी सुसंवाद ठेवून त्यांना निर्भय बनविले पाहिजे, असे आवाहनसुद्धा पालकमंत्र्यांनी केले.
खासदार नवनीत राणा संतप्त
ही घटना उजेडात आल्यावर खासदार नवनीत राणा यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. पीडित मुलीला न्याय मिळावा, यासाठी मी रस्त्यावर उतरणार असल्याचे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले. अमरावती येथील आरोग्ययंत्रणा पार ढासळली आहे. कोविड रुग्णांचे हाल होत आहेत. याच जिल्ह्यात महिला खासदार, महिला पालकमंत्री आहेत आणि याच जिल्ह्यात असे धक्कादायक प्रकार घडत आहेत. कोविडसाठी खासगी कंत्राटी लोक नियुक्त करण्यात आले. त्यांची मागील पार्श्वभूमी तपासून पाहिली पाहिजे, असेही खासदार राणा म्हणाल्या.
दरम्यान, संबंधित युवती ज्या मॉलमध्ये काम करीत होती, त्याठिकाणी सुद्धा नवनीत राणा यांनी आज भेट दिली. यासोबतच बडनेरा येथील रुग्णालयात जाऊन त्यांनी तेथील अधिकाऱ्यांना जाब विचारला.
घटना संतापजनक, निंदनीय
कोरोनाची रॅपिड टेस्ट करण्यासंदर्भात एक युनिट बडनेरा येथील ट्रामा केअर सेंटर येथे सुरू आहे. काल त्याठिकाणी जी घटना घडली ती माणुसकीला काळीमा फासणारी आहे. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, अशी मागणी मी करतो. आरोपीला अटक झाली आहे. तो महापालिकेचा कर्मचारी नव्हता. सर्व नियंत्रण जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून होत होते. मात्र, घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आहे, असे महापौर चेतन गावंडे म्हणाले.
आमचा नियुक्तीवर आक्षेप
या घटनेची निंदा करतो. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने नियुक्त्या दिल्या, त्या प्रक्रियेवर आमचा आक्षेप आहे. काल ज्याने गैरकृत्य केले तो मनोविकृत आहे. तही कागदपत्रे त्याच्याकडे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे नियुक्ती करताना त्याची पडताळणी का करण्यात आली नाही. त्याची पात्रता कशी तपासण्यात आली. याचा तपास केला पाहिजे. कारण कोरोनाचा विषय संवेदनशील आहे. आमच्या महिला भगिनी त्याठिकाणी तपासणी करण्यासाठी जात असतात, त्यामुळे कर्मचारी नियुक्तीच्या वेळी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. ज्याठिकाणी असे कंत्राटी कर्मचारी नियुक्त केले आहेत, त्या सर्वांच्या दस्तावेजांची योग्य पद्धतीने तपासणी करायला हवी. प्रत्येक ठिकाणी महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, गुन्हा करणाऱ्याला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी केली.
संपादन - स्वाती हुद्दार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.