यंदा माहूरगडावर शुकशुकाट, भक्तांविना रेणुका मातेच्या उत्सवाला सुरुवात

navratra celebration at renuka mata temple at mahurgad
navratra celebration at renuka mata temple at mahurgad

पुसद (जि. यवतमाळ): नवरात्र म्हणजे आदिशक्तीच्या चैतन्याचा आविष्कार. देवीच्या भक्तीचा जागर. 'उदे गं अंबा उदे' भक्तांच्या अलोट गर्दीतून घुमणारा गजर. यंदा देवीच्या उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. मात्र, भाविकांच्या मनात भक्ती कायम आहे. निसर्गरम्य माहूरगडावर रेणुकादेवीच्या नवरात्रोत्सवात हाच अनुभव येत आहे.

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी माहूर हे रेणुका देवीचे अर्धे पीठ. वनश्रीने नटलेल्या माहूर गडावरील रेणुका देवी ही परशुरामाची माता. तिला एकवीरा असेही नाव आहे. मातापूरवरूनच या गडाचे नाव माहूर पडले असावे, असे सांगण्यात येते. या माहूर गडावर नवरात्रात महाराष्ट्रातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येतात. त्यामुळे माहूरगडावर पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. यंदा मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भक्तांविना नवरात्र आरंभ होत आहे.

माहूर गडावरील रेणुका देवीचे जागरूक स्थान आहे. असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. माहूरवासीनी अनेकांची कुलदैवत आहे. येथील निसर्ग मनाला भूरळ घालतो. माहूर गडाच्या पायथ्यापासून शे-सव्वाशे दगडी पायऱ्या चढल्या की, रेणुका मातेचे मंदिर दृष्टीपथास येते. येथून दिसणारा आजूबाजूचा निसर्ग विलोभनीय वाटतो. हिरवीकंच झाडी, डोंगरकड्यांवरून थेट खोलदरीत झरझर उतरणारी. खाली दूरवर सखल भागात तुडुंब भरलेली जलाशये. हे मनोहारी दृश्‍य मन प्रसन्न करतात. त्यामुळे देवीचा गढ चढले की, भिरभिरत्या प्राणवायूने मनाला तरतरी मिळते व पायऱ्या चढून आल्याचा थकवा क्षणात दूर पळून जातो. तन जणू शुद्ध होते, तर देवीच्या दर्शनाने मन प्रसन्न होते. म्हणूनच भाविकांना देवीच्या दर्शनाची ओढ अगदी कासावीस करते.

रेणुका मातेची आणखी एक आख्यायिका सांगण्यात येते. रेणुका राजाला यज्ञातून कन्यारत्न प्राप्त झाले. अगस्ती ऋषीच्या इच्छेवरून तिचे लग्न जमदग्नी ऋषीसोबत लावून देण्यात आले. रेणुकाला पाच मुले. एकदा चित्ररथ गंधर्वाला नदीवर विहार करण्यासाठी आले असता, रेणुकाचे मन बावरले. उशीर झाल्याने ती लगबगीने घरी परतली. मात्र, जमदग्नी ऋषींनी अंतर्मनाने तिच्या मनातील चलबिचल हेरली. जमदग्नी क्रोधीत झाले. त्यांनी रेणुकेचा शिरच्छेद करण्याची आज्ञा मुलांना दिली. मात्र, परशुरामाने तत्काळ शिरच्छेद केला. तेव्हा जमदग्नी प्रसन्न झाले. त्यांनी परशुरामास वर मागण्यास सांगितले. परशुरामाने माता परत मिळावी, अशी इच्छा प्रकट केली आणि रेणुका माता परत जीवंत झाली. हीच माहूरची रेणुका माता होय. मंदिरातील रेणुका मातेची मूर्ती गळ्यापासून जमिनीवर आहे. तांबड्या केशरी रंगाची मूर्ती ओजस्वी आहे. सभोवती नंदादीप सदैव तेवत असतो. मनापासून पूजा केल्याने पातकांचा नाश होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. रेणुकामातेला तांबडी फुले खूप आवडतात. तसेच तिला विड्याचा तांबूल प्रिय आहे. नवरात्रात प्रत्येक दिवशी रेणुका देवीचा साजशृंगार करण्यात येतो. पूजाअर्चाने वातावरण मंगलमय बनते. भक्तांसाठी धावून येते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. त्यामुळे भाविक मोठ्या श्रद्धेने तिचे गुणगान करतात 'माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली' 

माहूर गडाची आख्यायिका -
माहूर गडासंदर्भात एक आख्यायिका आहे. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली तेव्हा सर्वांत आधी माहूरचा छोटा नकाशा तयार केला. श्रीविष्णूने माहूरला सुदर्शन चक्र आधार दिला. नंतरच ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. रेणुका मातेचे मंदिर तेराव्या शतकात यादवकालीन राजाने बांधले असावे. या मंदिर परिसरातच उंच टेकड्यांवर परशुराम, अनुसया व कालिका मंदिर ही पवित्र स्थाने आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com