सावधान! नक्षली परिषदेत हिंसक कारवाया घडवून आणण्यावर मंथन?

naxalite
naxalite

एटापल्ली (जि.गडचिरोली)  : एकीकडे नक्षल्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू असतानाच नक्षली कारवायांच्या मुळावरच घाव घालणाऱ्या कारवाया पोलिसांकडून जीव धोक्‍यात घालून सुरू आहेत. यामध्ये पोलिसांना बऱ्यापैकी यशही मिळत असतानाच नक्षल्यांचे सुरक्षित क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या गट्टा पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील येळदळमी गांव जंगल परिसरात गेल्या आठवड्यात नक्षल्यांची तीन दिवसीय परिषद पार पडली. यात नक्षलसंघटनेच्या कामगिरीवर चिंता व्यक्त करून दक्षिण गडचिरोली झोनमध्ये पुन्हा सक्रीय होऊन हिंसक कारवाया घडवून आणण्यावर मंथन करण्यात आल्याचे कळते.

महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगाणा व आंध्रप्रदेशातील नक्षल चळवळीतील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या तीन दिवसीय परिषदेला पेरमिली, भामरागड, अहेरी, गट्टा, कसनसुर, व टिप्पागड आदी नक्षल दलमचे कमांडर हजर होते. जहाल नक्षल नेत्यांच्या उपस्थितीत नक्षल संघटनेच्या कामगिरीचा आढावा घेऊन नक्षलग्रस्त भागात पुन्हा हिंसक कारवाया घडवून आणण्यासाठी काय करता येईल, यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, परिषदेच्या शेवटच्या दिवशी अचानक पोलिसांना कॅम्पबाबत माहिती मिळाल्याने झालेल्या गोळीबारात पेरमिली नक्षल दलम कमांडर शंकर ठार झाला. परंतु अन्य नक्षली नेते पळून गेले.

कस्नासूर चकमकीत 40 नक्षली ठार झाले होते. या घटनेतून नक्षली अजून सावरले नाहीत. गडचिरोली जिल्हा पोलिस दलाने गेल्या वर्षभरात काही जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याने नक्षल चळवळीचे मोठे नुकसान झाले. याचा बदला घेण्यासाठी नक्षल्यांच्या दक्षिण गडचिरोली झोनच्या एटापल्ली, भामरागड, अहेरी, मुलाचेरा, धानोरा व सिरोंचा आदी नक्षल प्रभावी तालुक्‍यात हिंसक कारवाया घडवून आणण्याबाबत नक्षल्यांच्या परिषदेत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

रवी पुंगाटीची हत्या आली अंगलट
एटापल्ली तालुक्‍यात दहशत निर्माण करून परिषद यशस्वी करण्याच्या हेतूने नक्षलवाद्यांनी 11 जूनला गुडंजूर येथील रवी झुरु पुंगाटी या युवकाची पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून हत्या केली होती. या घटनेनंतर पोलिसांचे या भागात नक्षल विरोधी अभियान सुरू होते. पोलिसांना नक्षली हालचालीचा अंदाज आल्याने मोठा घातपात घडविण्याची नक्षल्यांची योजना फसली. नक्षल्यांनी आयोजित केलेल्या परिषदेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शस्त्र व नक्षल साहित्य पोलिसांना सापडले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com