तब्बल 38 खून करणारे नक्षल दाम्पत्य गडचिरोली पोलिसांच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 March 2020

2009 मधील मरकेगाव जंगलात झालेल्या चकमकीतही त्याचा सहभाग होता. दादापूर येथील वाहनांची जाळपोळ व जांभूळखेडा येथे भूसुरूंग स्फोटाच्या घटनेची रेकी व प्लॅनिंगमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. शासनाने दिनकर गोटावर एकूण 16 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. 

गडचिरोली : विविध पोलिस ठाण्यात 141 गुन्हे दाखल असलेला नक्षलवाद्यांच्या कोरची दलमच्या उत्तर-गडचिरोली विभागीय समितीचा सदस्य पदावर कार्यरत असलेला दिनकर गोटा व त्याच दलमची सदस्या असलेली त्याची पत्नी सुनंदा कोरेटी यांना गडचिरोली पोलिस दलाच्या विशेष पथकाने बुधवारी (ता. 4) अटक केली आहे. नक्षल संघटनेचे दोन जहाल नक्षलवादी पोलिसांच्या हाती लागल्याने नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे. 

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी बुधवारी (ता. 4) घेतलेल्या पत्रकार परिषदेत नक्षलवाद्यांच्या अटकेची माहिती दिली. ते म्हणाले, कुरखेडा तालुक्‍यातील दादापूर येथे 36 वाहनांना आग लावण्याच्या व 1 मे 2019 रोजीच्या भूसुरूंगाचा स्फोटाचा मुख्य सूत्रधार दिनकर गोटा हाच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या स्फोटात 15 पोलिस जवान व एक खासगी वाहनचालक शहीद झाले होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवून दिनकर व त्याची दुसरी पत्नी सुनंदा कोरेटी या दोघांनाही अटक केली. 

सविस्तर वाचा - वडील शाळेत जाऊन मुलीला म्हणाले चल आईला घेऊन येऊ, अन्‌ केले हे...

दिनकर गोटा 2005 मध्ये नक्षलवाद्यांच्या टिपागड दलममध्ये सहभागी झाला. त्यानंतर तो चातगाव दलम, टिपागड दलम, धानोरा दलम, टिपागड दलममध्ये महत्त्वाच्या पदांवर होता. 2016 पासून तो कोरची दलात विभागीय समिती सदस्य पदावर कार्यरत होता. त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात 33 खुनांसह 108 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 

2009 मधील मरकेगाव जंगलात झालेल्या चकमकीतही त्याचा सहभाग होता. दादापूर येथील वाहनांची जाळपोळ व जांभूळखेडा येथे भूसुरूंग स्फोटाच्या घटनेची रेकी व प्लॅनिंगमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता. शासनाने दिनकर गोटावर एकूण 16 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

ठळक बातमी - हवाई सुंदरी विमानाने नागपुरात आली, पॉश हॉटेलमध्ये थांबली आणि पुढे...

सुनंदा कोरेटी 2009 मध्ये नक्षल दलामध्ये भरती झाली. सध्या ती नक्षलवाद्यांच्या कोरची दलम सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर 38 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. शासनाने तिच्यावर एकूण 2 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. 28 फेब्रुवारी 2020 रोजी पोलिस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांच्यासमोर उत्तर गडचिरोली विभागीय समिती सदस्य असलेला विलास कोल्हा याने एके-47 शस्त्रांसह शरणागती पत्करली होती; तर नुकतेच चातगाव दलम कमांडरसह संपूर्ण चातगाव दलमच पोलिसांना शरण आला होता. जांभुळखेडा घटनेतील 8 आरोपींना गडचिरोली पोलिस दलाने यापूर्वीच अटक केली असून, घटनेचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. 

14 दिवसांची पोलिस कोठडी

दिनकर गोटा व सुनंदा कोरेटी या दोघांवर दादापूर येथील वाहन जाळपोळ प्रकरणी पुराडा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केलेले आहेत. या गुन्ह्यात त्यांना अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांनाही 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दिनकर गोटा सप्टेंबर 2019 मध्ये एका नक्षल महिलेसह दलममधून निघून गेल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गडचिरोली पोलिस सातत्याने त्याच्या मागावर होते. अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले व गोटा दाम्पत्य गजाआड झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naxalite couple arrested in Gadchiroli