कोरेगाव भिमा प्रकरणातील 'तो' नक्षलवादी चकमकीत ठार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

कोरेगाव भिमा प्रकरणातील 'तो' नक्षलवादी चकमकीत ठार?

sakal_logo
By
ओमकार वाबळे

गडचिरोली पोलिसांनी राबवलेल्या काँबॅट ऑपरेशनमध्ये 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 6 जाणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर उडालेल्या चकमकीत कोरेगाव भीमा प्रकरणाशी संबंधित एका आरोपीचा भाऊ ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. एमटी नावाने या माओवाद्याला संबोधलं जात होतं. या व्यक्तीचा संबंध पुण्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी झालेल्या हिंसाचात होता, अशी माहिती मिळत आहे.

या चकमकीत आणखी दोन जण ठार झाले आहेत. जोगन्ना नावाच्या नक्षलवाद्याकडे छत्तीसगढ आणि महाराष्ट्र बॉर्डरचा कार्यभार असल्याची माहिती मिळत आहे. त्यासोबतच विजय रेड्डी नावाचा माओवादीही ठार झाला आहे.

2018 साली झालेल्या कोरेगाव भीमा दंगलीमध्ये काही डाव्या विचारसरणीच्या विचारवंतांनाही पोलिसांनी अटक केली होती. या दंगलीतील काही संशयितांमध्ये आज ठार झालेल्या नक्षलवाद्याचं नाव समोर आलं होतं. पोलिस अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होते. अखेर आज झालेल्या कारवाईत त्याला कंठस्नान घालण्यात आलं आहे.

प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात शनिवारी सकाळी पोलिसांचे सी-६० पथक शोध अभियान राबवीत होते. यावेळी लपून बसलेल्या नक्षल्यांनी अचानक सी-६० पथकावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत गोळीबार केला. या चकमकीत 26पेक्षा जास्त नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

loading image
go to top