या जहाल नक्षलवाद्याकडे सापडली एके-४७, पोलिसांच्या वाढत्या दबावापुढे केले आत्मसमर्पण

gadchiroli naxalite
gadchiroli naxalite

गडचिरोली : नक्षल्यांच्या उत्तर गडचिरोली विभागाचा कमांडर-इन-चिफ व चातगाव दलमचा विभागीय सदस्य विलास कोल्हा (४४) याने आज एके-४७ बंदूक, ३ मॅगजिन व ३५ राऊंडसह गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे व अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी विलास कोल्हा हा देखील उपस्थित होता. मागील २० वर्षांपासून नक्षल चळवळीत असलेल्या विलास कोल्हा याच्यावर खून, जाळपोळ, चकमक व अन्य १४९ गुन्हे आहेत. शासनाने त्याच्यावर साडे आठ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

नक्षल चळवळीत तेलगू भाषिक नेतृत्वाचा वरचष्मा असून, ते चळवळीतील स्थानिक आदिवासींना दाबण्याचा प्रयत्न करतात. शिवाय जंगलात वेळेवर अन्न न मिळणे, सततची पायपीट, पुरेसे पैसे उपलब्ध करून न देणे इत्यादी कारणांमुळे आपण आत्मसमर्पण करीत असल्याचे विलास कोल्हाने यावेळी सांगितले. त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात १४७ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

साडेआठ लाखाचे होते बक्षीस
विलास कोल्हा हा एटापल्ली तालुक्यातील विकासपल्ली येथील  रहिवासी असून, विवाहित आहे.  २००० मध्ये नक्षल चळवळीत भरती झालेल्या विलासने एटापल्ली, कोरची, टिपागड, चामोर्शी, कसनसूर अशा विविध दलममध्ये दलम सदस्य, उपकमांडर, कमांडर, डीव्हीसी अशा वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे. उत्तर गडचिरोलीचा कमांडर-इन-चिफ म्हणूनही काम पाहत होता. तीन महिन्यांपूर्वी त्याच्याकडे चातगाव दलम कमांडर व डीव्हीसी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले की, वर्षभरात ४ डीव्हीसी, प्रत्येकी २ कमांडर व उपकमांडर तसेच २६ दलम,कंपनी व प्लाटून सदस्य आणि १ जनमिलिशिया सदस्याने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. नवसंजीवनी योजनेंतर्गत आपण विलास कोल्हाचा भाऊ व नातेवाईकांना पत्र पाठवून विलासला आत्मसपर्मण करण्यास प्रवृत्त करण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत विलास कोल्हा याने आत्मसमर्पण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com