पोलिसांना ठार मारण्याचा नक्षल्यांचा होता कट, स्फोटके केली निकामी

मुनेश्वर कुकडे
Sunday, 27 September 2020

पोलिसांना जीवे मारण्याच्या उद्देशाने कोसबी जंगल परिसरात नक्षल्यांनी स्फोटके पेरून ठेवली आहेत, अशी गुप्त माहिती अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना रविवारी (ता.२७) मिळाली.

गोंदिया ः चिचगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कोसबी जंगल परिसरातून नक्षल्यांनी पेरून ठेवलेली स्फोटके निकामी करण्यात पोलिसांना यश आले आहे. नक्षल्यांनी पोलिसांना ठार मारण्याच्या उद्देशाने ही स्फोटके पेरून ठेवली होती, अशी माहिती आहे. 

पोलिसांना जीवे मारण्याच्या उद्देशाने कोसबी जंगल परिसरात नक्षल्यांनी स्फोटके पेरून ठेवली आहेत, अशी गुप्त माहिती अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना रविवारी (ता.२७) मिळाली. या माहितीवरून त्यांच्या नेतृत्वाखाली सी-६० देवरी येथील कमांडो पथक, बीडीडीएस पथक, नक्षल ऑपरेशन सेल देवरी व चिचगड पोलिस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोसबी जंगलात सर्च ऑपरेशन केले.

यावेळी कोसबी ते धानोरी जंगल परिसरात बीडीडीएस पथकाला काही संशयास्पद वस्तू आढळल्या. दरम्यान, खबरदारीच्या उपाययोजना करून वस्तूंची पाहणी पथकाने केली असता, त्याठिकाणी आयईडी पेरून ठेवल्याचे दिसून आले. 

लघुपटाच्या नायिकेनेच लावला निर्मात्याला लाखोंचा चुना
 

सदर आईडी बीडीडीएस पथकाने निकामी करून बाहेर काढले. यात निळ्या रंगाचा प्लॅस्टिक ड्रम, पिवळ्या व पांढऱ्या रंगाची स्फोटक पावडर, सुपर पॉवर जिलेटिन, जिवंत इलेक्‍ट्रीक डिटोनेटर, लोखंडी पत्रे व खिळे, जाड काचेचे तुकडे, काळ्या-पिवळ्या रंगाच्या इलेक्‍ट्रीक बॅटऱ्या, प्रेशर कुकर, नक्षल पत्रके, इलेक्‍ट्रीक वायर, काळ्या रंगाचे टेप व इलेक्‍ट्रीक पेन असे साहित्य आढळून आले. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहेत. 

बहिणीला त्रास देणाऱ्या जावयाला शेततळ्यात बुडवले

यांनी केली ही कारवाई 

पोलिस अधीक्षक विश्‍व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वात देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल, नक्षल सेलचे सहायक पोलिस निरीक्षक कमलेश बच्छाव, चिचगडचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल तवाडे तसेच रक्षा-६० कमांडो पथक, देवरी, लांडगे सी-६० पथक देवरी, नक्षलसेल देवरी येथील अधिकारी, कर्मचारी, सशस्त्र दूरक्षेत्र गणुटोला येथील अधिकारी, कर्मचारी, बीडीडीएस पथक गोंदिया यांनी ही कारवाई केली.

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naxalites had a plan to kill police, Explosive defused