esakal | पोलिस म्हणतात, नक्षल्यांनी ठार केलेला तो युवक माजी नक्षली 
sakal

बोलून बातमी शोधा

Adiwasi Rally

यासंदर्भात पोलिसांनी म्हटले आहे की, मुन्शी देवू ताडो हा विशेष पोलिस अधिकारी (एसपीओ) नसून तो व त्याची पत्नी जैनी मुन्शी ताडो हे नक्षल दलममध्ये कार्यरत होते.

पोलिस म्हणतात, नक्षल्यांनी ठार केलेला तो युवक माजी नक्षली 

sakal_logo
By
मिलींद उमरे

गडचिरोली : भामरागड उपविभागातील धोडराज पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील अतिदुर्गम व संवेदनशील असलेल्या भटपार या गावातील मुन्शी देवू ताडो (वय 28) याला शनिवारी (ता. 11) नक्षलवाद्यांनी ठार केले होते. तो पोलिसांचा एसपीओ (विशेष पोलिस अधिकारी) असल्याचे सांगितले जात होते. पण, तो एसपीओ नसून माजी नक्षलवादी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

यासंदर्भात पोलिसांनी म्हटले आहे की, मुन्शी देवू ताडो हा विशेष पोलिस अधिकारी (एसपीओ) नसून तो व त्याची पत्नी जैनी मुन्शी ताडो हे नक्षल दलममध्ये कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी नक्षली जीवनाला कंटाळून, नक्षलवादी स्थानिक आदिवासी बांधवांवर करत असलेले अन्याय, अत्याचार तसेच नक्षलवादी आदिवासी बांधवांच्या विकासात नेहमीच आडकाठी निर्माण करतात, याचा तिटकारा येऊन दोघांनीही नक्षलवादी जीवन सोडून दिले व ते सामान्य आयुष्य जगत होते. असे असतानासुद्धा नक्षलवाद्यांनी केवळ संशयापोटी त्याचा खून केला. त्यामुळे मुन्शी ताडोच्या हत्येमुळे नक्षलवाद्यांचा खरा हिंसक चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. 

अवश्य वाचा- `माझ्याशी लग्न कर अन् बायकोला हाकलून दे` प्रेयसीने तगादा लावल्याने प्रियकराने दिले विहिरीत ढकलून.... 

नक्षलवाद्यांनी आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात 734 निष्पाप नागरिकांचे खून केले आहेत. यापुढे नक्षलवाद्यांनी कोणत्याही नागरिकाचा खून करू नये. तसेच सप्ताह पाळून हिंसक कारवाया करू नये म्हणून भटपार गावातील नागरिकांनी एकत्र येत नक्षलविरोधी आक्रोश रॅली काढत नक्षलवाद्यांच्या हिंसक कृत्याचा जाहीर निषेध केला.

अवश्य वाचा- घरातच उघडला होता त्याने बनावट विदेशी दारूचा कारखाना, अन् एक दिवस... 

किष्टापूर नाल्याच्या पुलाच्या बांधकामावरील वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षलवाद्यांच्या या हिंसक कृत्याविरुद्ध तेथील नागरिकांनी विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी पंचक्रोशीतील 22 गावांतील ग्रामस्थांनी ग्रामसभेचा ठराव घेऊन नक्षल गावबंदी करून पुलाचे बांधकाम पूर्णत्वास नेले. त्याच धर्तीवर भटपार येथील नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कृत्याविरुद्ध एकवटून जनआक्रोश रॅली काढून नक्षलवाद्यांचा विरोध करीत असल्याचे सांगितले. या नागरिकांचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कौतुक केले असून गडचिरोली पोलिस दल ग्रामस्थांच्या सदैव पाठीशी राहील, अशी दिली आहे. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर