सहा राज्यांमध्ये बंद पाळण्याचे नक्षलवाद्यांचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहा राज्यांमध्ये बंद पाळण्याचे नक्षलवाद्यांचे आवाहन

सहा राज्यांमध्ये बंद पाळण्याचे नक्षलवाद्यांचे आवाहन

गडचिरोली : कोरची तालुका-छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागातील मर्दिनटोला जंगलात झालेल्या चकमकीत मिलिंद तेलतुंबडेसह २७ नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार केले. याच्या निषेधार्थ माओवादी कम्युनिस्ट पक्षाने २७ नोव्हेंबरला देशातील सहा राज्यांमध्ये बंद पाळण्याचे आवाहन केले आहे. भाकपा (माओवादी)चा केंद्रीय प्रवक्ता अभय याने यासंदर्भात प्रसिद्धिपत्रक जारी केले आहे.

या प्रसिद्धिपत्रकात मिलिंद तेलतुंबडेसह अन्य नक्षल्यांनी नक्षल चळवळीसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मर्दिनटोला जंगलातील घटनेच्या निषेधार्थ २७ नोव्हेंबरला महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणा व आंध्र प्रदेश या सहा राज्यांमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. शिवाय २७ नक्षलवाद्यांच्या हत्येचा बदला घेण्याची धमकीही अभयने दिली आहे.

नक्षलवादी दरवर्षी २ ते ८ डिसेंबर या कालावधीत पीपल्स गुरिल्ला आर्मीचा स्थापना सप्ताह साजरा करतात. या सप्ताहादरम्यान नक्षलवादी अनेक हिंसक कारवाया करतात. त्यामुळे २७ नोव्हेंबरच्या बंदनंतर पीएलजीए सप्ताहात ते हिंसाचार घडवू शकतात. या पार्श्वभूमीवर पोलिस पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. १३ नोव्हेंबरला गडचिरोलीच्या मर्दिनटोलाच्या जंगलात २७ नक्षलवादी पोलिसांनी ठार केले.

पोलिसांच्या सी-६० पथकाने केलेली ही गेल्या काही दिवसांमधली मोठी कारवाई मानली जात आहे. या मोहिमेत केंद्रीय समितीचा सदस्य जहाल नक्षली मिलिंद तेलतुंबडेही ठार झाला. नक्षलवाद्यांनी आपल्या पत्रकात मिलिंद तेलतुंबडेचा उल्लेख शहीद असा केला आहे. मिलिंद तेलतुंबडेसह २७ जण शहीद झाल्याचे या पत्रकात म्हटले आहे. आम्ही या शहिदांना क्रांतिकारी म्हणून जोहार अर्पण करतो, असे यात नमूद करण्यात आले आहे. तसेच या घटनेचा बदला घेतला जाईल, असेही म्हटले आहे. मिलिंद तेलतुंबडे आणि अन्य नक्षल्यांच्या मृत्यूने मोठी हानी झाल्याचा उल्लेखही या पत्रकात आहे.

टॅग्स :vidarbha