कंत्राटदाराकडून खंडणी न आणल्याने नक्षलवाद्यांनी आपल्याच समर्थकाला संपविले 

मिलिंद उमरे 
Thursday, 3 September 2020

येडमपायली ते हलामीटोला रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराकडून पैसे वसूल करून नक्षलवाद्यांना दिले नाही, या कारणावरून नक्षलवाद्यांनी त्याला बंदुकीची गोळी झाडून ठार केले.

गडचिरोली : नक्षलवाद्यांनी आपल्याच एका समर्थक सहकाऱ्याचा खून केला. ही घटना गडचिरोली पोलिस उपविभागाअंतर्गत येणाऱ्या पोटेगाव पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील नागवेली येथे मंगळवारी (ता.१) घडली. सखाराम झगडू नरोटे (वय ३३) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

मंगळवारी रात्री २० ते २५ बंदुकधारी नक्षलवादी सखाराम नरोटे याच्या घरी जाऊन त्याला व त्याचा भाऊ श्यामराव अलसू नरोटे यांना घरून घेऊन जात मारहाण केली. त्यानंतर श्यामराव नरोटे याला गावात सोडून दिले. नंतर सखाराम नरोटे याला जवळच असलेल्या हलामीटोला परिसरात नेले.

अवश्य वाचा- पहिल्या लग्नाबाबत दुसरीला कळले अन् उडाला गोंधळ
 

येडमपायली ते हलामीटोला रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराकडून पैसे वसूल करून नक्षलवाद्यांना दिले नाही, या कारणावरून नक्षलवाद्यांनी त्याला बंदुकीची गोळी झाडून ठार केले, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून दिली आहे. सखाराम नरोटे हा २०१५ पासून नक्षल समर्थक म्हणून कार्यरत असल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. तो नक्षलवाद्यांना मदत करीत होता, असे म्हटले आहे. 

आतापर्यंत घेतले ५३५ सामान्यांचे बळी 

गडचिरोली जिल्हा गेल्या ४० वर्षांपासून नक्षलग्रस्त असून नक्षलवाद्यांचा पाया असलेल्या एआरडी /जीआरडी/ जन मिलीशियासुद्धा नक्षलवाद्यांच्या दहशतीला बळी पडत आहेत. नक्षलवाद्यांनी आतापर्यंत ५३५ पैकी काही सामान्य नागरिकांचा, पोलिसांचे खबरे असल्याचा संशय घेऊन तसेच नक्षलवाद्यांना मदत करणाऱ्या नक्षल समर्थकांचा त्यांचे वैयक्तिक वाद व पैशांच्या वादावरून खून केले असल्याचे पोलिसांनी प्र 
सिद्धी पत्रकात म्हटले आहे.

संपादन ः राजेंद्र मारोटकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naxals killed their own supporter not to bring money from contractor