दिलासादायक : या जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्ण निघाला निगेटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 April 2020

अहेरी तालुक्‍यातील नागेपल्ली येथे संशयित रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाच्या लक्षात आल्यानंतर प्रशासनाकडून तत्काळ दखल घेऊन दोन दिवस गावात यशस्वी लॉकडाउन करण्यात आले. संभावित संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना राबविण्यात आल्या. यामध्ये "त्या' संशयित रुग्णाचा अहवाल गुरुवारी (ता. 9) रात्री निगेटिव्ह आल्याने गडचिरोली जिल्हा कोरोनामुक्त राहिला.

गडचिरोली : गेल्या आठवडाभरापासून गडचिरोलीसह संपूर्ण राज्यात नागेपल्ली येथील संशयित रुग्णाबाबत चर्चा सुरू झाली होती. प्रशासनाला संशयित रुग्ण आढळल्यानंतर तत्काळ पुढील संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्यात आली.

 

नागेपल्ली गावात आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, महसूल व ग्रामस्थ यांच्या समन्वयातून संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली.

 

प्रत्येक सीमा बंद

गावात येणाऱ्या प्रत्येक सीमा बंद करण्यात आल्या. गावातील व्यक्ती बाहेर नाही आणि बाहेरील व्यक्ती गावात नाही, याची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली. संबंधित संशयित रुग्णाला भेटलेल्या व त्याच्या आजूबाजूच्या 50 लोकांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले.

अहवालाची वाट न पाहता संशयित रुग्णाची लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने याबाबत काळजी घेण्यात आली. जिल्हाधिकारी दीपक सिंगला व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तर पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या सहकार्याने या प्रक्रियेला गती मिळाली.

आरोग्यविषयक कामांना गती

यामध्ये आशा, आरोग्य सेवक, तालुका आरोग्य अधिकारी व त्यांचे सर्व सहकारी यांनी गावात आरोग्यविषयक कामांना गती दिली. कोणत्याही प्रकारे संभावित संसर्ग होणार नाही, याची दखल घेण्यात आली. नागेपल्ली परिसरातील सर्व पेट्रोल पंप, सेवासदन दवाखाने, बॅंक, दुकाने प्रामुख्याने दोन दिवस बंद ठेवण्यात आली होती.

हेही वाचा : गडचिरोलीच्या चिमुकलीने मुख्यमंत्र्याना लिहिले दुसरे पत्र, केली ही मागणी

आरोग्य विभागाच्या चमूचे यश

आरोग्य विभागाच्या 54 अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या 23 टीमने नागेपल्ली येथे रुग्ण शोधमोहीम राबवली. संभावित संसर्ग टाळण्यासाठी गावातील 1098 घरांचे सर्वेक्षण पूर्ण केले. 4133 सदस्यांची तपासणी पूर्ण केली. यामध्ये त्यांना 3 लोकांना ताप आणि खोकला आढळून आला; तर एक वर्षाच्या आतील 60 मुलांचीही तपासणी करण्यात आली. 18 गरोदर महिलांनाही यावेळी आवश्‍यक उपचार करण्यात आले.
-


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Negative of corona patient at gadchiroli