esakal | कोरोनाच्या संशयाने या कुटुंबाला शेजारी देताहेत वाईट वागणूक
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus

कोरोना संशयित म्हणत त्यांच्या सभोवतालचा संपूर्ण परिसरच सॅनिटाईझ करण्यात आला आहे. त्यांना कोरोनाग्रस्त असल्यासारखे वागवण्यात येत आहे. यामुळे हे कुटुंब प्रचंड दहशतीत आहे.

कोरोनाच्या संशयाने या कुटुंबाला शेजारी देताहेत वाईट वागणूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

घुग्घुस(जि. चंद्रपूर) : कोरोनाविषयी पसरवल्या जाणाऱ्या अफवांमुळे लोकांत दहशत पसरली आहे. असाच अनुभव घुग्घुस येथील एका कुटुंबाला आला आहे. त्यांना कोरोना संशयित म्हणत त्यांच्या सभोवतालचा संपूर्ण परिसरच सॅनिटाईझ करण्यात आला आहे. त्यांना कोरोनाग्रस्त असल्यासारखे वागवण्यात येत आहे. यामुळे हे कुटुंब प्रचंड दहशतीत आहे.
घुग्घुस येथे वेकोलिची वसाहत आहे. तिथे हे कुटुंब राहते. त्यांचा मुलगा हा पंजाब येथील एका विद्यापीठात ऐरो स्पेस इंजिनिअरिंग या विषयात पदवी घेत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हा तरुण 20 मार्चलाच गावी परतला. याची रीतसर प्रशासनाला रीतसर माहिती देऊन तो होमकोरोन्टीन झाला. त्याला आधीपासूनच खोकला होता. यासाठी तो हळदीचा काढा पीत होता. मात्र, यामुळे उलट त्याचा त्रास वाढला आणि त्याला श्‍वास घेणेही जड होऊ लागले. एक एप्रिलला रात्री त्याला वेकोलिच्या राजीव रतन रुग्णालयात नेण्यात आले. त्याला बघून डॉक्‍टरही घाबरले. त्याला इंजेक्‍शन दिले. मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याने जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकेसाठी विनंती केली. मात्र, रुग्णवाहिका चालकाने नकार दिला. अखेर खूप विनवण्या करून तसेच इंधनाचे पैसे देण्याचे मान्य केल्यावर तो तयार झाला. त्याला रात्रभर विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्‍टरांनी तपासणी केली असता त्याच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे आढळली नाहीत. त्याच्या घशाला संसर्ग झाला होता. यासाठी डॉक्‍टरांनी औषध दिले आणि परत पाठविले.

सविस्तर वाचा - कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण म्हणतो मला बळजबरीने पकडून ठेवले आहे, सोशल मीडियावर केला व्हिडिओ व्हायरल

मात्र, याच दरम्यान घुग्घुस येथे कोरोनाचा पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याची अफवा पसरली. यामुळे या तरुणाकडेच संशयाच्या नजरेने पाहिले जात होते. या तरुणाचे वडील वेकोलित कार्यरत आहेत. वेकोली प्रशासनाला ही माहिती मिळताच त्याच्या वडिलांच्या कामाच्या परिसराचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आले. एवढेच नव्हे तर या कामगार वसाहतीचे देखील निर्जंतुकीकरण करण्यात आले. त्या मुलामध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे नसताना या कुटुंबाकडे अपराधी दृष्टीने बघण्यात येत आहे. हा प्रकार अजूनही सुरू आहे. यामुळे हे कुटुंब प्रचंड दहशतीत आहे.  

loading image