नवा गडी नवा राज

नवा गडी नवा राज

नागपूर : सुरेश भोयर, उदयसिंग यादव तसेच टेकचंद सावरकर यंदाच्या निवडणुकीत नवे चेहरे असून आमदार सुनील केदार, माजी मंत्री अनिल देशमुख तसेच आमदार समीर मेघे यांच्यासाठीसुद्धा प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे रिंगणात नसल्याने त्यांच्या "ऊर्जेची' कमतरता भाजपला भासणार आहे. 
कामठीमध्ये भाजपचे टेकचंद सावरकर आणि कॉंग्रेसचे सुरेश भोयर यांच्यात थेट लढत होणार आहे. रामटेकमध्ये उदयसिंग यांच्या रूपाने कॉंग्रेसने नवा चेहरा दिला आहे. त्यांना भाजपचे उमेदवार मल्लिकार्जुन रेड्डी आणि शिवसेनेचे बंडखोर उमेदवार माजी आमदार आशीष जयस्वाल या दोघांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे रामटेकमध्ये खऱ्या अर्थाने तिरंगी लढत बघायला मिळणार आहे. 
उमरेडमध्ये राजू पारवे यांना कॉंग्रेसची उमेदवारी देण्यात आली आहे. मुळक स्वतः रिंगणात नसल्याने ते उमरेडमध्ये सक्रिय राहणार आहेत. येथ पारवे विरुद्ध भाजपचे उमेदवार आमदार सुधीर पारवे यांच्यात सामना रंगणार आहे. हिंगण्यातही राष्ट्रवादीचे नेते रमेश बंग यांनी विश्रांती घेऊन विजय घोडमारे यांना भाजपातून आपल्याकडे खेचून आणले आहे. त्यामुळे येथील लढत रंगतदार झाली आहे. भाजपचे उमेदवार आमदार समीर मेघे यांना यावेळी अधिक कडवी झुंज द्यावी लागेल, असे दिसते. 
सावनेरमध्ये सुनील केदार यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी भाजपने जातीच्या राजकारणाचा विचार न करता जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पातदार यांना मैदानात उतरवले आहे. त्यांच्या प्रचाराला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार असल्याने येथील लढत हायव्होल्टेज होण्याची शक्‍यता आहे. 
रामटेकमध्ये तिघांची माघार, चौरंगी लढत 
रामटेक : मतदारसंघात चौरंगी लढत रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे बंडखोर व माजी आमदार आशीष जयस्वाल यांची उमेदवारी कायम आहे. त्यांचा थेट सामना भाजपचे मल्लिकार्जुन रेड्डी, कॉंग्रेसचे उदयसिंग (गज्जू) यादव व प्रहारचे रमेश कारेमोरे यांच्याशी होणार आहे. 
सावनेरमध्ये केदार-पोतदार थेट लढत 
सावनेर : विधानसभा मतदारसंघात दंबग नेते तसेच कॉंग्रेसचे सुनील केदार व भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांच्यात थेट लढत होणार आहे. भाजपने संघटनेतील व्यक्तीला उमेदवारी दिल्याने ही लढत तुल्यबळ ठरणार असल्याचे मानले जात आहे. दोन्ही उमेदवारांनी प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे. 
हिंगण्यात मेघेंसमोर घोरमारेंचे आव्हान 
हिंगणा : हिंगणामध्ये भाजपचे समीर मेघे यांच्यासमोर भाजपमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झालेल्या माजी आमदार विजय घोडमारे यांचे आव्हान आहे. मतदारसंघात वंचित आघाडी व बसपचे उमेदवारही ताल ठोकून आहेत. हिंगणा मतदारसंघातील शहरी भागातच प्रचाराचा जोर राहणार आहे. 
कामठीत भोयर-सावरकर यांच्यात सामना 
कामठी : जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती टेकचंद सावरकर यांचा सामना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कॉंग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर यांच्याशी होणार आहे. ही लढत तुल्यबळ मानली जात आहे. कामठीतील मुस्लिम तर नागपूर शहरालगतच्या भागातील मते सावरकर यांच्याकडे वळू शकतात. 
पारवे बंधूतच खरी लढत 
उमरेड : भाजपचे सुधीर पारवे यांच्यासमोर यावेळी त्यांचे बंधू राजू पारवे हे कॉंग्रेसची उमेदवारी मिळविण्यात यशस्वी ठरल्याने या दोघांमध्येच खरी लढत होणार आहे. राजू पारवे यांना कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. वृक्षदास बन्सोड यांना यावेळी वंचितने उमेदवारी दिली आहे. 
काटोलमध्ये देशमुख-ठाकूर 
काटोल : भाजपचे चरणसिंग ठाकूर व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनिल देशमुख यांच्यात थेट लढतीचे चित्र आहे. वंचितकडून दिनेश टुले यांना उमेदवारी मिळाली आहे.मागील 25 वर्षांपासून काटोल मतदारसंघात अनिल देशमुख यांचे वर्चस्व आहे. दहा वर्षांपासून काटोल शहरात चरणसिंग ठाकूर यांची एकहाती सत्ता आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com