अमरावतीत लवकरच होणार मल्टीपर्पज स्पोर्ट हब; विविध क्रीडास्पर्धा होणार एकाच दालनात

क्रिष्णा लोखंडे
Sunday, 24 January 2021

प्रस्तावित जिल्हा क्रीडासंकुलात आर्चरी रेंज, प्रेक्षक गॅलरी, लॉन, मल्टीजिम व वूडन, सिंथेटिक फ्लोरिंगसह ज्यूडो हॉल, बास्केटबॉल क्रीडांगण, स्केटिंग रिंकसह प्ले एरिया, कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉलकरिता प्रत्येकी एक-एक मैदाने निर्माण करण्यात येत असल्याची माहिती समितीचे सचिव तथा जिल्हा क्रीडाधिकारी गणेश जाधव यांनी दिली.

अमरावती ः अमरावती जिल्हा क्रीडा संकुलाकरिता शासनाने आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीमधून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रवेशद्वारासमोरील खुल्या शासकीय जागेवर मल्टीपर्पज स्पोर्ट हब साकारण्यात येणार आहे. या स्पोर्ट हबसाठी आमदार सुलभा खोडके यांनी विशेष प्रयत्न केले. शनिवारी (ता. 23) त्यांनी जागेची पाहणी केली.

क्रीडा पायाभूत विकास कार्यक्रमांतर्गत मल्टीपर्पज स्पोर्ट हबसाठी आमदार सुलभा खोडके यांनी शासनदप्तरी पाठपुरावा करून आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करवून घेण्यात यश मिळवले. या स्पोर्ट हबसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील खुली जागा निवडण्यात आली आहे. शनिवारी त्यांनी क्रीडाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.

नक्की वाचा - असाही एक अवलीया... जमीन दान करून केले गरिबांचे स्वप्न पूर्ण; थाटला दहा बेघरांचा संसार

28 हजार चौरस मीटर जागेवर हे स्पोर्ट हब उभारण्यात येणार आहे. जिल्हा क्रीडासंकुल प्रकल्पांतर्गत विविध क्रीडा सुविधा निर्मितीसाठी जिल्हा क्रीडा समितीने 14 कोटी 32 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते. जिल्हा क्रीडासंकुलात क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी आठ कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला असून त्यापैकी 4 कोटी 31 लाख रुपये अनुदान समितीस प्राप्त झाले आहे.

प्रस्तावित जिल्हा क्रीडासंकुलात आर्चरी रेंज, प्रेक्षक गॅलरी, लॉन, मल्टीजिम व वूडन, सिंथेटिक फ्लोरिंगसह ज्यूडो हॉल, बास्केटबॉल क्रीडांगण, स्केटिंग रिंकसह प्ले एरिया, कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉलकरिता प्रत्येकी एक-एक मैदाने निर्माण करण्यात येत असल्याची माहिती समितीचे सचिव तथा जिल्हा क्रीडाधिकारी गणेश जाधव यांनी दिली.

नक्की वाचा - खुशखबर! ‘त्या’ कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने नव्हे, तर विष खाल्ल्याने; अहवाल...

या पाहणीदौऱ्याप्रसंगी आमदार सुलभा खोडके यांच्या समवेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, जिल्हा क्रीडाधिकारी गणेश जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता मनीषा खरैय्या, सहायक अभियंता एन. प्रकाश रेड्डी, यश खोडके, माजी महापौर विलास इंगोले, ऍड. किशोर शेळके, मनपा विपक्ष नेता बबलू शेखावत, माजी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, नगरसेवक प्रशांत डवरे उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Multipurpose sports hub will be build in Amravati