खुशखबर! ‘त्या’ कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने नव्हे, तर विष खाल्ल्याने; अहवाल निगेटिव्ह

संदीप गोरखेडे
Saturday, 23 January 2021

आधीच कोरोनाच्या संचारबंदीने कुक्कुट व्यावसायिक आणि चिकन विक्रेते मेटाकुटीस आले होते. त्यातच आता बर्ड फ्लूने व्यवसायावर अवकळा येण्याची पाळी आली होती. मात्र, त्या कोंबड्या बर्ड फ्लूने मेल्या नसून विषारी पदार्थ खाल्ल्याने मेल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले.

कोदामेंढी (जि. नागपूर) : कोरोनाच्या महामारीनंतर आता बर्ड फ्लूचा कहर आल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आपत्ती व्यवस्थापन विभागाने अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोदामेंढी येथील मगनलाल बावनकुळे यांच्या शेतात असलेल्या घरातील ३३ कोंबड्यापैकी १४ कोंबड्या मेल्या. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि प्रशासनदेखील सज्ज झाले. मृत कोंबड्याचे नमूने पुणे आणि भोपाल येथे तपासणीकरीता पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला. त्या १४ कोंबड्या विषजन्य पदार्थ खाल्ल्याने मेल्याचे स्पष्ट झाले आहे.

बर्ड फ्लूची भीती सध्या वाढली असून याबाबत लोकामंध्ये संभ्र निर्माण झालेला आहे. मात्र, लोकांमधील भीती दूर करण्यासाठी चक्क पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांनी चिकनची पार्टी ठेवली होती. त्याचबरोबर पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनीदेखील लोकांना आवाहन करीत अंडी आणि कोंबड्या खाण्यावर भर दिला आहे.

जाणून घ्या - मुलाला खटकले आईचे प्रेमसंबंध अन् उचलले धक्कादायक पाऊल, आईने काढली समजूत

कोदामेंढी येथे कोंबड्या मेल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख तथा तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी लोकांना अलर्ट राहण्याचा इशारा दिला होता. त्याचबरोबर तपासणीचा अहवाल येईपर्यंत चिकनसेंटर बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. पशुवैद्यकीय विभागाच्या चमूने देखरेख आणि नियंत्रण ठेवीत एक किलोमीटर अंतरावरील परिक्षेत्रात संचारबंदी ठेवली होती.

बर्ड फ्लू संसर्गजन्य असून स्थलांतरीत पक्ष्यांमुळे होतो. आपल्या परिक्षेत्रात कुठेही मृत पक्षी आढळून आलेले नाही. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या होत्या. असेही पशुवैद्यकीय अधिकारी सुजीत तापस यांनी सांगितले. आधीच कोरोनाच्या संचारबंदीने कुक्कुट व्यावसायिक आणि चिकन विक्रेते मेटाकुटीस आले होते. त्यातच आता बर्ड फ्लूने व्यवसायावर अवकळा येण्याची पाळी आली होती. मात्र, त्या कोंबड्या बर्ड फ्लूने मेल्या नसून विषारी पदार्थ खाल्ल्याने मेल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले.

चिकनसेंटर सुरू करण्यास हरकत नाही
मृत कोंबड्यांच्या अहवाल निगेटिव्ह आला आहे. विषारी पदार्थ खाल्ल्याने त्या मेल्या. आता चिकनसेंटर सुरू करण्यास हरकत नाही. 
- प्रशांत सांगडे,
तहसीलदार, मौदा

नक्की वाचा - गृहमंत्र्यांकडून पोलिस भरतीचा संभ्रम दूर; दुसऱ्या टप्प्यात आधी शारीरिक चाचणी नंतरच लेखी परीक्षा

गाईडलाईन सध्या यायची आहे
नमूने पुणे आणि भोपाल येथे पाठविण्यात आले. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. ऑफिसिअल गाईडलाईन सध्या यायची आहे. 
- सुजित तापस,
पशुवैद्यकीय अधिकारी, कोदामेंढी

तहसीलदारांच्या आदेशानंतर चिकनसेंटर बंद
तहसीलदारांनी चिकनसेंटर बंद करण्याचे आदेश दिले होते. म्हणून बंद केले. 
- विवेक सोनवणे, 
ठाणेदार, अरोली

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Those chickens died from eating poison