बँकांचे नवे धोरण शेतकऱ्यांना जाचक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New policy of banks is oppressive to farmers Agricultural loans wardha

बँकांचे नवे धोरण शेतकऱ्यांना जाचक

वर्धा : बँकांचे बदललेले आर्थिक धोरण शेतकऱ्यांना आर्थिक गर्तेत ढकलत आहे. कृषिकर्जाचे ‘वन टाइम सेटलमेंट’ (एकरकमी परतफेड) करणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांनी नवे कृषीकर्ज नाकारले आहे. सोबतच कर्जमाफीमुळे सीबिल खराब झालेल्या सांगत शेतकऱ्यांना कृषिपूरक व्यवसायासही कर्ज नाकारण्यात आले आहे. एकीकडे ओल्या दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता बँकांच्या बदललेल्या धोरणाचा फटका बसत आहे. बँकांचे हे नवे धोरण शेतकऱ्यांना पुन्हा सावकाराच्या दारी नेत आहे. हे धोरण असेच कायम राहिल्यास शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती आत्महत्येचा फास सैल होण्याऐवजी तो अधिक घट्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वर्धा तालुक्याच्या सावली येथील शेतकरी हनुमान शिंदे यांच्याकडे तीस एकर शेती आहे. यांच्यावर नऊ लाख रुपये कृषी कर्ज होते. त्यांनी बँकेशी चर्चा करून वन टाइम सेटलमेंट करून आपले कर्ज २२ एप्रिल २०२२ रोजी भरले. यानंतर त्यांनी गावातील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत नवीन कृषी कर्जासाठी अर्ज केला. सुरुवातीला नो ड्यू प्रमाणपत्र प्रमाणपत्र आणण्यास सांगण्यात आले. ते दिल्यावर विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. मात्र, आता बँकेच्या धोरणात बदल झाल्याचे कारण सांगून नवीन कृषी कर्ज देता येणार नसल्याचे सांगितले. यामुळे शेतकऱ्यावर ‘‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी वेळ आली आहे. एवढेच नव्हे तर बदलेल्या या धोरणाचा फटका कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा बसत आहे. कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचा सिबिल स्कोर कमी झाल्याचे कारण सांगून त्यांना कृषिपूरक व्यवसायावर कर्ज देणे बंद करण्यात आले आहे. यामुळे दुग्धव्यवसाय, कुकुटपालन, शेळीपालन, अन्नप्रक्रिया उद्योग, सिंचन आदींसाठी कर्ज मिळणे बंद झाले आहे. साधारणतः वर्धा जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात विविध बँकेच्या १२० शाखा आहेत. प्रत्येक शाखेत ५० ते ५५ शेतकऱ्यांनी आपले कृषी कर्ज वन टाइम सेटलमेंट केले आहे. यामुळे एका जिल्ह्यातच अशा शेतकऱ्यांची संख्या सहा हजारांवर पोहोचते.

शेतकऱ्याची आत्महत्या

कुंभा (जि. यवतमाळ) : मारेगाव तालुक्यातील कुंभा महसूल मंडळ अंतर्गत येणाऱ्या नरसाळा येथील अल्पभूधारक युवा शेतकऱ्याने निंबाच्या झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपविली. ही घटना शनिवारी (ता. २७) उघडकीस आली. गजानन नारायण मुसळे (वय २८) असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या अल्पभूधारक युवा शेतकऱ्‍याचे नाव आहे. गजाननकडे चार एकर कोरडवाहू शेती आहे. अतिवृष्टीमध्ये पिकाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होणार असल्याने आर्थिक विवंचनेत होता, अशी माहिती गावकऱ्‍यांनी दिली.

बँक कृषी कर्ज देत नसल्याबाबत वन टाइम सेटलमेंट केलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आहे. बँकांनी आपल्या धोरणात बदल केल्याने त्यांना नकार दिला जातो आहे. या संदर्भात राज्यस्तरीय बँकर समितीला पत्रव्यवहार करण्यात आले असून पुढील बैठकीत हा मुद्दा मांडणार.

- वैभव लहाने, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक, वर्धा

Web Title: New Policy Of Banks Is Oppressive To Farmers Agricultural Loans Wardha

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..