esakal | "वाचकपत्रां'नाच बनविले प्रबोधनाचे हत्यार
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

"वाचकपत्रां'नाच बनविले प्रबोधनाचे हत्यार

sakal_logo
By
चंद्रशेखर महाजन

नागपूर : समाजात जनजागृती आणि लोकांच्या समस्या सुटाव्यात म्हणून आंदोलन, मोर्चे, प्रसंगी आत्मदहनासारखे मार्ग निवडतात. मात्र, समाजप्रबोधनासाठी असे मार्ग न निवडता फक्‍त वृत्तपत्रांतील "वाचकपत्रां'चा आधार घेत साडेसहा हजारांवर पत्रे प्रकाशित करून अहिंसात्मक आंदोलनाचा मार्ग स्वीकारणारा व्यक्‍ती हा एकप्रकारे अवलिया. या पत्र अवलियाची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनेही दखल घेत त्यांच्या पत्र आंदोलनावर शिक्‍कामोर्तब केले. हर्षवर्धन दामोदर कांबळे असे या अवलियाचे नाव असून, ते व्यवसायाने डॉक्‍टर आहेत.
जगातील सर्व वृत्तपत्रांमध्ये संपादकीय पानावर वाचकांचे पत्र हा स्तंभ असतो. या स्तंभामध्ये वाचकांना अपेक्षित असलेल्या समस्या किंवा गाऱ्हाणी मांडली जातात. कधी कोणाचे अभिनंदन तर कधी राजकीय नेत्यांवर टीकाटिप्पणी केली जाते. मात्र, नागपुरातील चंद्रमणीनगर येथील हर्षवर्धन कांबळे यांनी वेगळाच छंद जोपासला. 1992 पासून हा छंद नव्हे, तर जनजागृतीची मशाल त्यांनी सतत तेवत ठेवली आहे. चंद्रमणीनगरासारख्या झोपडपट्टी भागातील रहिवासी असलेले हर्षवर्धन कांबळे यांनी वस्तीतील भयावह जीवन अगदी जवळून बघितले. राजकीय नेते, अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते ज्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत, लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात, अशा समस्या आणि विषयांवर त्यांनी लेखन केले. यासाठी माध्यम निवडले ते वृत्तपत्रांतील "वाचकांचे पत्र'. त्यांच्या सामाजिक चेतनेला वृत्तपत्रांनीही साथ दिली. आतापर्यंत त्यांनी 6 हजार 500 पेक्षा अधिक पत्रे प्रकाशित झाली आहेत, तसेच 2007 मध्ये सतत 214 पत्रे लिहून व प्रकाशित होण्याचा विश्‍वविक्रम केला आहे. त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये झाली आहे. आतापर्यंत अनेक वृत्तपत्रांतून त्यांचे लिखाण प्रसिद्ध झाले आहे. पत्राच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अनिष्ट चालीरीती तसेच परिसरातील समस्यांना वाचा फोडली. अनेक विषयांना त्यांनी हात घातला. या जनजागृती माध्यमातून अनेक समस्या मार्गी लावल्या आहेत. संपादकांना सर्वाधिक पत्र लिहिण्याची नोंद 2005 मध्ये गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, 2010 मध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि 2016 मध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. पुन्हा ते वाचकांच्या पत्रातून विश्‍वविक्रम नोंदविण्यासाठी सरसावले आहेत. हा संकल्प यापुढेही सुरू ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. यातून विविध समस्या मांडण्यात येतील. तसेच लोकांमध्ये जनजागृतीही करण्यात येईल, असे डॉ. हर्षवर्धन कांबळे म्हणाले. डॉ. कांबळे यांच्या कार्याची दखल घेत अनेक सामाजिक संस्थांनीही पुरस्कृत केले आहे हे, विशेष.

चंद्रमणीनगरासारख्या भागात राहत असताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. या गंभीर समस्यांनी वाचकांचे पत्र लिहिण्याची प्रेरणा दिली. हा संकल्प पुढेही सुरूच ठेवणार आहे.
- डॉ. हर्षवर्धन कांबळे, नागपूर

loading image
go to top