कोविड काळातही साडेनऊ हजार पिशवी रक्त संकलन; यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालय अव्वल

टीम ई सकाळ
Monday, 25 January 2021

‘रक्तदान सर्वश्रेष्ठ दान’ चळवळ ग्रामीण व शहरी भागात चांगलीच रुजली आहे. रक्तदान करून वाढदिवस साजरा करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तीन वर्षांत सर्वाधिक पिशवी रक्तसंकलन करून वैद्यकीय महाविद्यालय अव्वल राहिले आहे.

यवतमाळ : कोविड काळात जगाची चक्रे थांबली असतानाच बाधितांना रक्ताची गरज पडली. या संकटसमयी रक्तदाते मदतीला धावून आले. वर्षभरात १४२ शिबिरांच्या माध्यमातून ९ हजार ५७० पिशवी रक्त संकलन करण्यात आले. त्यामुळे बऱ्यापैकी रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी एकमेव आशेचा किरण आहे. खासगी रुग्णालयात जाऊन उपचार करणे अनेकांना परवडत नाही. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी धाव घेतात. जिल्ह्यात सिकलसेलग्रस्त, थालेसेमियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून, त्यांना दरमहा रक्त द्यावे लागते. शिवाय अपघातग्रस्तांनाही रक्ताची आवश्‍यकता असते.

अधिक माहितीसाठी - 'मेडीकल'समोरील दृश्य पाहून डॉक्टरांचेही पाणावले डोळे, पण बघ्यांच्या भूमिकेशिवाय काहीच करू शकले नाही

प्रसूतीसाठी आलेल्या महिलांनाही रक्त दिले जाते. अशावेळी रक्ताचा मुबलक साठा उपलब्ध राहावा यासाठी सामाजिक संघटना व आरोग्य यंत्रणेच्या वतीने शिबिरांच्या माध्यमातून रक्तसंकलन केले जाते. ‘रक्तदान सर्वश्रेष्ठ दान’ चळवळ ग्रामीण व शहरी भागात चांगलीच रुजली आहे. रक्तदान करून वाढदिवस साजरा करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तीन वर्षांत सर्वाधिक पिशवी रक्तसंकलन करून वैद्यकीय महाविद्यालय अव्वल राहिले आहे.

वर्ष शिबिरे रक्तसंकलन
२०१८ १२३ १४,००३
२०१९ १२८ १३,५००
२०२० १४२

९,५७०

भविष्यात रक्ताचा तुटवडा भासणार नाही
मागील तीन वर्षांत सर्वाधिक रक्तसंकलन करून वैद्यकीय महाविद्यालय अव्वल राहिले आहे. सामाजिक संघटना, महाविद्यालयीन विद्यार्थी रक्तदानात पुढाकार घेत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. २६ लाख रुपये किमतीची रक्तसंकलन वाहिनी मिळाल्याने ग्रामीण भागात जाऊन रक्तसंकलन करता येणार आहे. त्यामुळे भविष्यात रक्ताचा तुटवडा भासणार नाही.
- डॉ. मिलिंद कांबळे,
अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine and a half thousand bags of blood collected during the Kovid period