maharoath.jpg
maharoath.jpg

अबब..नऊ क्विंटलचा ‘महारोठ’; वाचा कुठे आणि कसा बनवला

संग्रामपूर (जि.बुलडाणा) : महाशिवरात्रीचे रात्री हर हर, महादेवच्या आणि पलसी वाले बाबा की, जयच्या जयघोषात बनला नऊ क्विंटल वजनाचा एकच महाकाय महारोठ तयार करण्यात आला.

दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या पळशी झाशी येथील शंकरगिरी महाराज मंदिर परिसरात 21 फेब्रुवारीचे रात्री भक्तांनी ओल्या अंगाशी महारोठ निर्मिती केली. यामध्ये रात्री 8 वाजता महाराजांची आरती झाली. नंतर या कार्याला गावातील 30 ते 40 तरुण, वृद्ध भक्तांनी सुरुवात केली. तत्पूर्वी महाराजांनी ठरवलेल्या जागेवर रानगोवऱ्याचे जगरे महाराजांच्या धुनीतून पेटविण्यात आले. नंतर रोडगा तयार करायला सुरुवात करण्यात आली. याचे एक एक किलोचे गोळे एका पितळी डेग मध्ये व कोपरात जमविण्यात आले. हे सर्व गोळे केळीच्या पानावर 11 मिटर कोऱ्या कापडावर एकावर एक असे मसाज करून रचण्यात आले. 

आज महाप्रसादाचे वितरण
एकच असा नऊ क्विंटल वजनाचेवर महाकाय असा महारोठ घट्ट केळीच्या बंधाने बांधून रान गोवऱ्याच्या विस्तवात भाजण्यासाठी पाच तास ठेवण्यात आला. हे सर्व हजारो भक्तांच्या उपस्थित शंकर गिरी बाबा आणि हर हर महादेवच्या गजरात करण्यात आले. हा कुठलाही चमत्कार नसून बाबाच्या तपश्‍चर्येचे अमृत फळ असल्याचे मानले जाते. या महारोठ निर्मितीला वैज्ञानिक, अध्यात्मिक अशी जोड असून या प्रसादाचे वितरण आज 22 फेब्रुवारीच्या पहाटे पासून सुरू करण्यात येणार आहे. रोडग्याच्या प्रसादाने पारणे फेडण्याची परंपरा या ठिकाणी शेकडो मैलाचा प्रवास करीत हिमालयातून 19 व्या शतकाच्या अगदी उत्तरार्धात शंकरगिरी नावाचे अजान बाहू तपस्वी आले. त्यांनी गावाच्या पूर्वेस दाट वटवृक्षाच्या सावलीत महादेवाच्या पिंडीची स्थापना केली. 

प्रसंग शंकरगिरी विजय ग्रंथात नमूद
1905 चे दरम्यान ग्रामस्थांच्या मदतीने या ठिकाणी शिवमंदिराची उभारणी केली. त्यावेळी महाशिवरात्रीचा सर्वांना उपवास असल्याने त्या उपवासाचे पारणे फेडण्यासाठी महाराजांनी ह्या रोडगा निर्मितीची सुरुवात केली. सकाळी प्रसाद सेवन केल्यानंतर गावा घरोघरी रोडगे केले जातात व भोजनाचा आस्वाद घेतला जातो. शंकरगिरी महाराजांनी आपल्या अलौकिक दिव्य सामर्थ्याने असंख्य जीवाचा उद्धार केला आहे. असे बरेच प्रसंग शंकरगिरी विजय ग्रंथात नमूद आहेत. या प्रसाद सेवनाने बऱ्याच व्याधी दूर होतात म्हणून भाविक वर्षभर घरात हा रोठाचा प्रसाद सांभाळून ठेवतात अशीही भाविकांची आस्था आहे.

असे आहे ‘महारोठ’चे साहित्य
सव्वा तीन क्विंटल कणीक आटा, साडेतीन क्विंटल साखर, 85 ते 90 किलो गावरान तूप, 70 ते 75 लिटर दुध, 35 किलो मनुखा, 35 किलो खारीक, 15 किलो बदाम, 15 किलो काजू, अडीच किलो विलायची, 5 किलो काळे मेरू, 5 किलो शोपं, 100 नग जायफळ, 50 ग्राम केसर, 30 किलो खोबराखिस, असे साहित्य महारोठ करण्यासाठी वापरण्यात आले.

दरवर्षी रोठाचे वजन वाढते
महाराजांनी आपल्या काळात सव्वा मनाच्या रोडग्यापासून सुरुवात केली. ती कला ग्रामस्थांना देऊन गावाची एकजूट करण्याचे कामही या निमित्ताने महाराजांनी त्या वेळी करून ठेवले आहे. या गावाला रोडगा निर्मितीमुळे मोठी ओळख मिळाली आहे. ही परंपरा पावित्र्य राखून असल्याने आजही सुरू आहे. दरवर्षी रोठाचे वजन वाढत आहे. यामुळे निर्मिती करणाऱ्यांना त्रास ही होतो, परंतु महाराजांबद्दल असलेली श्रद्धा पाहता वाढत्या वजनाचा रोठ ही मोठ्या उत्साहात तयार केला जात आहे.
-गुलाबराव मारोडे, कार्याध्यक्ष, शंकर गिरी महाराज संस्थान, पळशी झाशी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com