गडकरी म्हणाले, ते पुन्हा तिकीट मागताहेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

'युती होईलच'वर हशा... 
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनविण्याचा संकल्प करा. जागावाटपाची तुम्ही चिंता करू नका. युती होईलच... असे सांगून गडकरी यांनी पॉज घेताच सभागृहात एकच हशा पिकला. कार्यक्रम आटोपल्यानंतरही या पॉजचीच सर्वत्र चर्चा होती. गडकरी यांना नेमके काय म्हणायचे होते, याचा तर्क प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या परीने काढत होता.

नागपूर : शहरात फक्त सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. मात्र, शेकडो कार्यकर्त्यांना तिकीट पाहिजे आहे. एक खुर्चीवर दहा लोकांना बसवणे शक्‍य नाही. याचा विचार करा. ज्याला पक्ष उमेदवारी देईल त्याचे काम प्रामणिकपणे करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप इच्छुकांना केले. यावेळी त्यांनी राजकारणात येताना समाजसेवेचाही हेतू असू द्या, असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला. 

शिवसेनेच्या "आरे'ला भाजपचे नाणारचे "कारे'

बुधवारी सुरेश भट सभागृहात झालेल्या भाजपच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. गडकरी म्हणाले, आपल्या पक्षाचा इतिहास बघितल्यास पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट दिले आहे. अनेक जण असेही आहेत, ज्यांनी समर्पित भावनेने काम केले, त्यांना तिकीट वा कुठलेही पद मिळाले नाही. आणीबाणीच्या काळात परिवाराच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या संघर्षामुळे आज हा दिवस बघायला मिळतो आहे. ते कार्यकर्ते आज आपल्यात नाहीत. या कार्यकर्त्यांचे बलिदान विसरता कामा नये, असेही गडकरी म्हणाले. 

मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा; शाळांना सुटी 

पक्षाकडूनही चुका होतात 
ज्यांना तिकीट मिळत नाही, ते विचारतात माझ्यात काय कमी आहे. मी इतके दिवस काम केले, माझा विचार करणार नाही का, हा प्रश्‍न इमोशनल असतो. ज्यांना तिकीट मिळत नाही, त्यांना समजाविणे अवघड असते. कोणी डोळ्यांत पाणी आणतो तेव्हा आम्हालाही अवघडल्यासारखे होते. 

एखादवेळी उमेदवारी देताना पक्षाकडून चूक होते. मात्र, ती जाणीवपूर्वक केली जात नाही, अशी समजूतही यावेळी गडकरी यांनी काढली. 

एकदा म्हणून वारंवार तिकीट मागतात! 
आमदार होण्यापूर्वी अनेक कार्यकर्ते फक्त एकदा व शेवटची संधी द्या, अशी विनंती करतात. वयाचे व तब्येतीचे दाखले देतात. मात्र, एकदा आमदार झाल्यानंतर ते ताजेतवाने होतात. वय व तब्येत विसरून वारंवार तिकीट मागायला येतात. लढण्यासाठी आशीर्वाद मागतात, असे विनोदाने गडकरी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मंचावर उपस्थित आमदारांकडे कटाक्ष टाकून काही जण पत्नीला किंवा मुलाला तिकीट देण्याची विनंती करीत असल्याचे सांगितले. 

'युती होईलच'वर हशा... 
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनविण्याचा संकल्प करा. जागावाटपाची तुम्ही चिंता करू नका. युती होईलच... असे सांगून गडकरी यांनी पॉज घेताच सभागृहात एकच हशा पिकला. कार्यक्रम आटोपल्यानंतरही या पॉजचीच सर्वत्र चर्चा होती. गडकरी यांना नेमके काय म्हणायचे होते, याचा तर्क प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या परीने काढत होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitin Gadkari talked about candidates for contest in Vidhan Sabha 2019