वेतन आयोगाला फाटा, कर्मचाऱ्यांनी वापरला "नोटा' !

वेतन आयोगाला फाटा, कर्मचाऱ्यांनी वापरला "नोटा' !

नागपूर : सातवा वेतन आयोगाबाबत राज्य सरकारनेच अडथळा निर्माण केल्याने संतप्त महापालिका कर्मचाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत कुठल्याही पक्षाला मतदान करण्याऐवजी "नोटा'चा वापर केल्याचे समजते. महापालिकेतील 16 हजार कर्मचाऱ्यांपैकी आठ हजारांवर कर्मचाऱ्यांनी "नोटा'चा वापर करीत राज्य सरकारला धडा शिकविल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत अडीचपटीने "नोटा'चा वापर झाल्याचे आकडेवारीने स्पष्ट केले. 
राज्य सरकारने सर्व महापालिकांना कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे नागपूर महापालिकेतील 16 हजार कर्मचाऱ्यांतही आनंदाचे वातावरण होते. मात्र, राज्य सरकारमुळेच कर्मचाऱ्यांचा हा आनंद काही दिवसांचा ठरला. सरकारने सातवा वेतन आयोग देण्यापूर्वी राज्य सरकारची मंजुरी घ्यावी, असे परिपत्रक काढले. त्यामुळे सातव्या वेतन आयोगाची वेतन "शिट' तयार असूनही कर्मचाऱ्यांना नव्या वेतन आयोगानुसार वेतन देणे शक्‍य झाले नाही. एवढेच नव्हे सातव्या वेतन आयोगाची वेतन "शिट' तयार करताना सहाव्या वेतन आयोगाची "शिट' संगणकातून पूर्णपणे नष्ट करण्यात आली. परिणामी पुन्हा सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन करण्यातही अडचणी निर्माण झाल्या. एकीकडे वेतन वेळेवर मिळाले नाही, दुसरीकडे सातव्या वेतन आयोगाचा तोंडाशी आलेला घासही हिरावून घेतल्याने महापालिका कर्मचारी चांगलेच संतप्त झाले. त्यांनी सरकारचा वचपा काढण्यासाठी विधानसभा निवडणुकीत "नोटा'चा वापर केल्याचे सूत्राने नमूद केले. महापालिकेतील कर्मचारी तसेच शिक्षकांनी विधानसभा निवडणुकीत ठरवून भाजप किंवा इतर कुणालाही मतदान न करता "नोटा'चा वापर केल्याची चर्चाही महापालिका वर्तुळात रंगली आहे. महापालिकेत जवळपास 16 हजार कर्मचारी असून आठ हजारांवर कर्मचाऱ्यांनी "नोटा'चा वापर केल्याची शक्‍यता एका कर्मचाऱ्याने व्यक्त केली. एवढेच नव्हे "नोटा'चा वापर करून सरकारला धडा शिकविण्याची योजना निवडणुकीपूर्वीच तयार झाली होती, असेही या कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 
विधानसभा निवडणुकीत शहरातील सहाही मतदारसंघांत 16,669 मतदारांनी "नोटा'चे बटण दाबून उमेदवारांना नाकारले. यात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. पश्‍चिम नागपुरात सर्वाधिक 3,702 मतदारांनी "नोटा'चा वापर केला. या मतदारसंघात येथे भाजपचा 6,362 मतांनी पराभव झाला. या जागेसह उत्तरची जागाही भाजपने गमावली तर दक्षिण व मध्य नागपुरात जिंकण्यासाठी भाजपला घाम फुटला. कर्मचाऱ्यांनी "नोटा'चा वापर करीत सरकारला एकप्रकारे इशारा दिल्याची चर्चाही महापालिका वर्तुळात रंगली आहे. 
"नोटा' वापरकर्त्यांत दहा हजारांनी वाढ 
2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत सहाही मतदारसंघांत केवळ 6,148 मतदारांनी "नोटा'चा वापर केला होता. मात्र, या निवडणुकीत यात 10 हजार 500 मतांची भर पडली. शहरातील सहाही मतदारसंघांत 16,669 मतदारांनी "नोटा'चे बटण दाबले. 
मतदारसंघनिहाय "नोटा'चा वापर 
मतदारसंघ "नोटा'ला गेलेली मते(2019) 2014 
दक्षिण-पश्‍चिम 3,063 1,014 
दक्षिण 2,341 1,276 
पूर्व 3,460 1,051 
मध्य 2147 930 
पश्‍चिम 3,702 1,143 
उत्तर 1,986 734 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com