मिळत नाही भीक, तुम्ही म्हणता "ऑनलाइन' शिक...वाचा 

मिलिंद उमरे 
गुरुवार, 16 जुलै 2020

गडचिरोली शहरात काही भटकी कुटुंबे अडकली आहेत. मिळेल ती मोकळी जागा पाहून त्यांनी आपले तंबू उभारले आहेत. आता सर्वच क्षेत्रात मंदी असल्याने त्यांना कुठे काम मिळत नाही. त्यामुळे ते आपल्या मुलांसह भिक्षापात्र हाती धरून फिरतात. 

गडचिरोली : सध्या कोरोनामुळे शाळा बंदच असून ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात येत आहे. पण, अशी अनेक बालके आहेत ज्यांची जिंदगी भाकरीचा चंद्र शोधण्यात जात आहे. प्रत्येकापुढे हात पसरत भीक मागणाऱ्या या मुलांना कधी कधी भीकसुद्धा मिळत नाही. पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला असताना कुठली पुस्तके, कुठले शिक्षण आणि कुठून मिळणार महागडा अँड्रॉइड मोबाईल ? त्यामुळे "मिळत नाही भीक, तुम्ही म्हणता ऑनलाइन शिक', असे म्हणायची पाळी या वंचित बालकांवर आली आहे. हे

वाचा— पालघरच्या घटनेबाबत गृहमंत्र्यांचा मोठा खुलासा, वाचा काय म्हणाले ते... 

हातात दिले जाते भिक्षापात्र 
यंदा जगभर कोरोनाचा हाहाकार उडाला आहे. देशात अनेक असे गरीब समाज आहेत ज्यांचा उदरनिर्वाह भीक मागून होतो. इथे बालकांच्या हातात पाटी, पुस्तक नव्हे, तर भिक्षापात्र दिले जाते. दिवसभर भीक मागायची आणि आपल्या परिवाराला मदत करायची, यातच ही बालके अडकून पडतात. पूर्वी काही समाजातील लोक परंपरा म्हणून किंवा आत्यंतिक गरिबी म्हणून हे काम करायची. आता कोरोनामुळे भंगार गोळा करणे, रस्त्यावर कसरती, जादूचे खेळ दाखविणे, फुगे विकणे, मोलमजुरी करणे, अशी किरकोळ कामे करणाऱ्या अनेकांचे रोजगार हिरावले असून त्यांच्यावरही भीक मागण्याची वेळ आली आहे. इथे जगण्याचाच संघर्ष मोठा झालेला असताना शाळेची चैन त्यांना परवडणारी नाही. निदान पूर्वी त्यांची बालके कशीबशी शाळेत जाऊन बसायची. शिक्षक काही मदत करायचे. आता कोरोनामुळे शाळा बंद असून शिक्षण मोबाईलमधल्या चार बोटांच्या स्क्रीनवर एकवटले आहे. ही चमचमणारी मोबाईल स्क्रीन आकाशात चमकणाऱ्या चंद्राप्रमाणेच त्यांच्यापासून दूर आहे. गडचिरोली शहरात काही भटकी कुटुंबे अडकली आहेत. मिळेल ती मोकळी जागा पाहून त्यांनी आपले तंबू उभारले आहेत. आता सर्वच क्षेत्रात मंदी असल्याने त्यांना कुठे काम मिळत नाही. त्यामुळे ते आपल्या मुलांसह भिक्षापात्र हाती धरून फिरतात. 

हे वाचा— बारावीचा निकाल घोषित : राज्यात नागपूर विभाग पोहोचला या क्रमांकावर 
 

दिवसभर पसरलेले हात 
लहान बालकांना बघून अनेकांना दया येते. त्यामुळे त्यांना भीक सहज मिळते. म्हणून काही पालक आपल्या बालकांना एखाद्या दुकानापुढे किंवा रस्त्यावर उभे करून भीक मागायला लावतात. लॉकडाउनमुळे लोकांची गर्दी कमी असल्याने सहज भीक मिळत नाही. त्यामुळे या निरागस बालकांना दिवसभर हात पसरून लोकांची मनधरणी करावी लागते, तेव्हा कुठे त्यांच्या तंबूवजा झोपडीत चूल पेटते. सरकार सर्वांसाठी शिक्षणाच्या घोषणा देत असले, तरी या वंचित बालकांच्या हातचे भिक्षापात्र दूर सारून त्यांना ज्ञानदान देणार का, हा खरा प्रश्‍न आहे. 

यंदा कोरोनामुळे शालाबाह्य विद्यार्थ्यांची समस्या अधिक बिकट झाली आहे. पण, आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करत आहोत. मी शाळांच्या मुख्याध्यापकांना, शिक्षकांना सर्वेक्षण करायच्या सूचना देणार असून अशी वंचित बालके दिसल्यास त्यांना शैक्षणिक प्रवाहात नक्‍की आणू.
- आर. पी. निकम, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), गडचिरोली 

-संपादन :  चंद्रशेखर महाजन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No begging, you say "learn online" ... read on